झी मराठी वाहिनीवर मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. होळीनिमित्त सर्व मालिकांतील कलाकार एकत्र आल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक मालिकेत काही ना ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमधून दिसत आहे. त्याबरोबरच सर्व नायिका एकत्र येत खलनायिकांना धडा शिकवणार असल्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनी(Zee Marathi)वरील मालिकांच्या महासंगममध्ये काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याबरोबरच, सर्व कलाकार एकत्र आल्याने गमतीजमती घडत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. होळीला सर्वांनी रंगांची उधळण करीत आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले. आता या कलाकारांची एक रील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

लोकप्रिय कलाकारांचा ‘राणी माझ्या मळ्यामंदी’ गाण्यावर भन्नाट डान्स

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील सरस्वतीने म्हणजेच अभिनेत्री भूमिजा पाटीलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘लाखात एक आमचा दादा’मधील सूर्या, धनू, राजश्री व भाग्या दिसत आहेत. शिवा या माकेतील आशू व दिव्यादेखील या रीलमध्ये आहे. त्याबरोबरच ‘नवरी मिळे हिटलरला’ मधील सरस्वतीदेखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या सर्व कलाकारांनी एकत्र येत मकरंद अनासपुरे यांच्या गाजलेल्या ‘राणी माझ्या मळ्यामंदी…’ या गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचे दिसत आहे.

सगळ्यांचा उत्साह, एनर्जी त्यांच्या डान्समध्ये पाहायला मिळत आहे. आशू व सूर्या व्हिडीओच्या सुरुवातीला आणि शेवटी डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या डान्सने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओवर ‘शोमुळे विभागलेले आहोत; व्हाइबमुळे एकत्र आहोत’, असे लिहिलेले दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना भूमिजाने, ‘रीलचा महासंगम’, असे लिहित पुढे हार्ट इमोजी शेअर केली. पुढे तिने ‘शिवा’ मालिकेतील आशू म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि ‘लाखात एक आमचा दादा’मधील सूर्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण यांना टॅग करीत लिहिले, “आमचे कॅमिओ आर्टिस्ट, तुमच्याशिवाय ही रील अपूर्णच आहे.”

कलाकारांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी कलाकारांचे कौतुक केले आहे. “काय एनर्जी आहे”, “मस्त”, “भारी”, “कमाल”, असे म्हणत चाहत्यांनी कौतुक केले आहे; तर अभिनेत्री वल्लरी विराजने “क्रेझी” म्हणत कौतुक केले आहे. पूर्वा कौशिकने “वेड”, असे म्हटले आहे. अभिनेत्री सानिका काशिकरनेदेखील “वाह” म्हणत कौतुक केले आहे.

दरम्यान, मालिकांमध्ये दिसणारे हे कलाकार अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंना प्रेक्षकांची पसंतीही मिळताना दिसते. आता होळीनिमित्त या मालिकांच्या महासंगममध्ये नेमके काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.