झी मराठी वाहिनीवर ‘लक्ष्मी निवास'(Lakshmi Niwas) ही मालिका मोठ्या चर्चेत असते. या मालिकेत भावना, सिद्धू, जान्हवी, जयंत, विश्वा, लक्ष्मी, श्रीनिवास, आनंदी, वीणा, संतोष, हरीश अशी अनेक पात्रे पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असल्याचे दिसते. कधी कोणी चुकतं तर कधी कोणाच्या पदरी अपयश येतं.
कोणी त्याच्या संसारात खूश नाही तर कोणाला त्याचे प्रेम मिळत नाही, कधी मैत्रीमुळे जगण्याला नवी उभारी मिळते तर कधी पती-पत्नीचे आदर्श जोडपे लक्ष्मी-श्रीनिवास यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत वीणा ही भूमिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड(Meenakshi Rathod)ने साकारली आहे.
वीणा संतोषची बायको असून लक्ष्मी-श्रीनिवासची सून आहे. घरची मोठी सून म्हणून ती तिच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना दिसते. स्वार्थी विचार करणाऱ्या नवऱ्याला ती कडक शब्दांत घराच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देते. त्यामुळे वीणा हे पात्र सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे. मात्र, आता अभिनेत्री मीनाक्षी राठोड तिच्या भूमिकेमुळे नाही, तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
प्रत्येकासाठी स्वप्नवत गोष्ट…
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मीनाक्षी राठोडने सोशल मीडियावर मुंबईत घर घेतल्याची पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करताना तिने स्वप्नांच्या शहरात हक्काचं घर, असं म्हटलं होतं. आता तिने तिच्या घराबाबत वक्तव्य केले आहे. अभिनेत्री मीनाक्षी राठोडने नुकताच स्टार मीडियाशी संवाद साधला.
अभिनेत्री म्हणाली, “घर प्रत्येकासाठी स्वप्नवत गोष्टच असते. माझं मुंबईत घर असावं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मला गावी छान मोठा बंगला बांधायचा, शेत घ्यायचं, हे माझं स्वप्न होतं. पण, अर्थात जिथे आपली कर्मभूमी आहे, तिथे आपलं स्थान अढळ राहावं, तिथे आपण टिकून राहावं, यासाठी काहीतरी स्थैर्य लागतं. तर मला असं वाटलं की, एक छोटंसं घर घ्यावं. मोठं घर घ्यावं, असा विचार नव्हता. त्यामुळे आम्ही छान छोटंसं घर घेतलेलं आहे. आम्ही मुंबईत वास्तवाला येऊ तेव्हा ते उपयोगात येईल, असा विचार करून ते घर घेतलेलं आहे. छान वाटतंय, माझ्यासाठी आणि कैलाससाठीसुद्धा मुंबईत घर होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही असा कधी विचारही कधी केला नव्हता. विद्यार्थी म्हणून मुंबईत आलो होतो. मग मुंबईनं आम्हाला थांबवलं. इतकं भरभरून प्रेम दिलं.
पुढे चाहत्यांना उद्देशून अभिनेत्री म्हणाली, “तुम्ही सगळे माझ्या कुटुंबावर इतकं प्रेम करत आहात. यारा, कैलास व माझ्यावर तुम्ही खूप प्रेम करता. तुमच्या चांगल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. काम करीत राहिलो आणि तुमच्या आशीर्वादानं छान छोटंसं घरही झालंय. तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलंत, यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.”
मीनाक्षी राठोडच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती याआधी सुख म्हणजे नक्की काय असतं, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, अबोली या मालिकांत दिसली आहे. तिच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या भूमिकांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. आता ‘लक्ष्मी निवास’मधील तिचे वीणा हे पात्र गाजताना दिसत आहे.