दिवंगत अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं गेल्या वर्षी दु:खद निधन झालं. १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल यांनी कर्करोगाशी झुंज देऊन पुन्हा रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. पण अचानक आलेल्या आजारपणात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अतुल परचुरेंच्या जाण्यानंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली गेली. तसेच त्यांच्या अत्यंदर्शनालाही संपुर्ण कलासृष्टी हजर होती.
यावेळी अनेक कलाकारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. अतुल यांच्या जाण्यानं मराठीसह हिंदी मनोरंजन पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. त्यांच्या जाण्यानंतर अनेकांनी त्यांच्याबरोबरच्या काही आठवणी शेअर केल्या होत्या. अशातच आता यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ (Zee Natya Gaurav) सोहळ्यात अतुल परचुरेंना अनोखी आदरांजली वाहिली जाणार आहे.
यासाठी खास सादरीकरण केलं जाणार आहे आणि या सादरीकरणाची झलक नुकतीच शेअर करण्यात आली आहे. या सादरीकरणात अभिनेता अतुल तोडणकर हा अतुल परचुरेंची भूमिका साकारणार आहे. अतुल परचुरेंसाठी स्वर्गाचे दार उघडलं जाणार आहे. यावेळी त्यांना स्वर्गात “इथे सेटल झालास का?” असं विचारलं जातं. यावर अतुल परचुरे उत्तर देत म्हणतात की, “अजून तरी नाही. अजूनही सोनियाची… घरच्यांची… मित्रांची… खूप आठवण येते. खाली जाऊन विचारावसं वाटतं. मोन्या (संजय मोने) कसा आहेस रे? तुझी खूप आठवण येते यार…”
प्रोमोमध्ये पुढे अतुल परचुरे असं म्हणतात की, “बरं त्या अंड्याला (आनंद इंगळे) कुणीतरी सांगा… म्हणावं आत्ता तरी स्वत:चे किस्से सांग. सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळे पार्क क्लबमध्ये जमता ना? मी तुमच्या गप्पा ऐकतो. भेटत राहा रे… आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात”.
यानंतर या प्रोमोमध्ये अतुल परचुरेंच्या गेल्या वर्षीच्या ‘झी गौरव’ पुरस्कारामधील काही खास क्षण दाखवले जातात. अतुल तोडणकरच्या भूमिकेत अतुल परचुरेंना पाहून उपस्थित सगळेच कलाकार भावुक होतात. यावेळी अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात.
दरम्यान, गेल्या वर्षी ‘झी नाट्य गौरव २०२४’ मध्ये अतुल यांनी आनंद इंगळे, सुनील बर्वे, महेश मांजरेकर या कलाकारांसह ‘नटसम्राट’चे सादरीकरण केले होते. यावेळी संजय मोने, पुष्कर श्रोत्री, मोहन जोशी, भाऊ कदम, वैभव मांगले, चंद्रकांत कुलकर्णी या कलाकारांच्या हस्ते त्यांचा नाट्य गौरवच्या मंचावर सन्मान करण्यात आला होता.