मराठी नाट्यसृष्टीत प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा ‘झी नाट्य गौरव २०२५’ हा पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वी अतिशय उत्साहात पार पडला. येत्या ३० मार्चला संध्याकाळी ६ वाजता या सोहळ्याचं प्रक्षेपण टीव्हीवर करण्यात येणार आहे. यंदा झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात एकूण दोन जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. प्रकाश बुद्धीसागर आणि पुरुषोत्तम बेर्डे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. या दोघांबद्दल जाणून घेऊयात…

यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत, प्रकाश बुद्धीसागर.

मराठी रंगभूमीची आयुष्यभर सेवा करणारी अनेक नाटकवेडी माणसं आपण पाहिली असतील. पण मराठी रंगभूमी हेच ज्यांचं आयुष्य आहे असे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि रंगकर्मी म्हणजे ‘प्रकाश बुद्धीसागर’.

‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘आईशप्पथ’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘ब्रह्मचारी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘वटवट सावित्री’ यांसारखी अनेक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आहेत. मनोरंजनाबरोबरच व्यावसायिक दृष्ट्याही ही नाटकं प्रकाश बुद्धीसागर यांनी यशस्वी करून दाखवली. परंतु, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. यानंतर ते शारीरिकदृष्ट्या खचून गेले. काही जवळच्या लोकांनी त्यांची साथ सोडली. तर, काहींनी या परिस्थितीचा फायदा उचलत त्यांची फसवणूक केली. अंधार कितीही दाट असला तरी पुढच्या प्रवेशासाठी वाट काढत पुन्हा प्रकाशझोतात येण्याची शिकवण ही रंगभूमीच आपल्याला नकळत देत असते. त्याचप्रमाणे या गंभीर आजारातून प्रकाश बुद्धीसागर सावरले आणि पुन्हा एकदा रंगभूमीच्या सेवेत रुजू झाले. पुनरागमन केल्यावर त्यांनी ‘गौना अभी बाकी है’ नाटक लिहून काढलं. हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जीवनगौरव पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत ठरले आहेत… लेखक, दिग्दर्शक, परीक्षक, समीक्षक पुरुषोत्तम बेर्डे.

काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरचा एक अवलिया मनोरंजनाची एक भन्नाट टूर घेऊन निघाला जो आजवर कधी थांबलाच नाही. अनेक कलाकार, नाटकं, पुस्तकं, चित्रपट, जाहिराती ह्या टूरमध्ये सामील झाले आणि प्रवास अधिकाधिक संपन्न होत गेला. लेखक, दिग्दर्शक, परीक्षक, समीक्षक अशा अनेक भूमिकांमधून हा संपूर्ण गाडा मोठ्या कल्पकतेने पुढे नेणारे अष्टपैलू कलाकार म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे.

१९८३ साली त्यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं ‘टूरटूर’ हे चिरतरूण नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं. पुरुषोत्तम बेर्डेंच्या या पहिल्याच नाटकात अनेक दिग्गजांनी काम केलं. लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, सुधीर जोशी, विजय कदम, विजय चव्हाण, विजय केंकरे, चेतन दळवी, दीपक शिर्के हे टूरटूर नाटकात काम केलेले सारेच कलाकार पुढे जाऊन रंगभूमीचे सम्राट बनले.

त्यानंतर ‘गांधी विरुद्ध सावरकर’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘खंडोबाचं लगीन’, ‘चिरीमिरी’ पासून ते ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ पर्यंत सर्वच नाटकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. नाटकांबरोबरच ‘निशाणी डावा अंगठा’, ‘शेम टू शेम’, ‘हमाल दे धमाल’, ‘जमलं हो जमलं’ यांसारख्या त्यांच्या अनेक चित्रपटांनी देखील प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणलं. या साऱ्या व्यापातून वेळ काढून पुरुषोत्तम बेर्डे यांनी ‘हिरवी पोट्रेट्स’ आणि ‘क्लोज एन्काउंटर’ सारख्या पुस्तकांच्या माध्यमातून आपली लेखणी सतत लिहिती ठेवलीत. कलाक्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या कलाकारांसाठी ते कधी मार्गदर्शक झाले, तर कधी विविध नाट्यस्पर्धांचे परीक्षक. कधी मित्र म्हणून, तर कधी मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेकांना बरोबर घेऊन या नाट्यसृष्टीची पाऊलवाट अधिकाधिक विस्तारत ठेवली.