मराठी नाट्यसृष्टीत प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा ‘झी नाट्य गौरव २०२४’ हा पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वी अतिशय उत्साहात पार पडला. कलाकारांनी सादर केलेल्या नांदीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. येत्या रविवारी या सोहळ्याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रिया बापट, प्रशांत दामले, उमेश कामत, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, विराजस कुलकर्णी, ओंकार भोजने, भाऊ कदम असे बरेच कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
बालनाट्य, एकांकिका, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक या सगळ्यातील हुकमी नाव म्हणजे मोहन जोशी. ‘थँक्यु मिस्टर ग्लाड’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘नाती गोती’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘श्री तशी सौ’, ‘कुर्यात सदा टिंगलम’, ‘ती फुलराणी’, ‘मी रेवती देशपांडे’, ‘माझं छान चाललंय’, ‘कार्टी काळजात घुसली’ अशी एकूण पन्नासपेक्षा अधिक नाटके त्यांनी गाजवली आहेत. केवळ नाटकच नव्हेतर मालिका आणि चित्रपटांमध्येही त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला. यामुळे यंदाचा ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यातील ‘जीवनगौरव पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
हेही वाचा : २० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या? आदेश बांदेकर म्हणाले, “सुचित्राबरोबर लग्न केलं तेव्हा…”
मोहन जोशी याबद्दल लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “मला हा पुरस्कार स्वीकारून अतिशय आनंद झाला. त्यात माझी बालमैत्रीण रोहिणी हट्टंगडीच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारता आला याचा विशेष आनंद आहे. नाटक म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे. यामध्ये चांगलं काम कसं करता येईल यासाठी प्रत्येक कलावंत प्रयत्न करत असतो. प्रामाणिकपणे काम करून खूप कष्ट करण्याची तयारी ठेवा हा संदेश मी आताच्या नव्या पिढीला देईन.”
हेही वाचा : ऑस्करच्या अधिकृत पेजवर झळकली दीपिका पदुकोण! ‘बाजीराव मस्तानी’शी आहे खास कनेक्शन, पती रणवीर म्हणाला…
दरम्यान, ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण रविवारी ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विविध गाजलेल्या नाटकातील प्रवेशांक प्रेक्षकांना पाहायला मिळतील.