पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जुन्या संसदेतून नव्या संसदेत प्रवेश करण्याचा सोहळा पार पडला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षणाचं विधेयकही नव्या संसदेत सादर केलं. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होते आहे. अशातच अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ट्विट करत काय रिकामं आहे? असा प्रश्न विचारला आहे.
काय आहे प्रकाश राज यांचं ट्विट?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो त्यांनी ट्विट केला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात एक रिकामा फोल्डर आहे, तसंच त्यांच्या दुसरा हात त्यांच्या खिशात आहे. हा फोटो पोस्ट करत प्रकाश राज यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे. २०१४ पासून रोज पडलेलं कोडं, मला सांगा नेमकं काय रिकामं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असेला फोल्डर? त्यांच्या जॅकेटचा खिसा की त्यांचं डोकं? या आशयाचं ट्विट करत प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.
प्रकाश राज यांनी हे जे ट्विट केलं आहे त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. याआधी प्रकाश राज यांनी चांद्रयान ३ ची खिल्ली उडवली होती. त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली होती. आज नव्या संसदेत पंतप्रधान मोदींनी प्रवेश केला असता प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.