सध्या बॉलिवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांची आणि खासकरून त्यात वापरल्या जाणाऱ्या स्पेशल इफेक्टसची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या व्हीएफएक्सची लोक अजूनही थट्टा करत आहेत. अशातच एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या टिझरमुळे ही तुलना पुन्हा होऊ लागली आहे.
नुकतंच आगामी तेलुगू सुपरहिरो चित्रपट ‘हनुमान’चा टिझर प्रदर्शित झाला आहे. या टिझरमधील स्पेशल इफेक्ट आणि याची मांडणी ही प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली आहे. शिवाय हा एक लो बजेट चित्रपट असल्याचंही म्हंटलं जात आहे. यामुळेच याची तुलना थेट ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’बरोबर केली जात आहे. सोशल मीडियावर लोक याबद्दल बरंच बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा : KBC 14 : शूटिंग पूर्ण झालं की अमिताभ बच्चन सेटवर तब्बल २ तास या कामांमध्ये असतात व्यस्त; नाहीतर प्रेक्षक…
टिझरमध्ये अभिनेता तेजा सज्जा हा हनुमानाच्या अवतारात दिसणार आहे. हा एक सुपरहिरो चित्रपट असून इतिहासातील हनुमानाच्या संदर्भानुसार आत्ताच्या काळातील हनुमानासारखा सुपरहिरो या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. टिझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी याची तुलना आदिपुरुषशी करायला सुरुवात केली आहे. कमी बजेट असून तसेच यात कोणताही मोठा सुपरस्टार नसूनही हा चित्रपट बॉलिवूडवर भारी पडू शकतो असं नेटकरी हा टिझर पाहून म्हणत आहेत.
दिग्दर्शक प्रशांत वर्मा हे या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळी युनिव्हर्स साकारणार आहेत. प्रशांत यांनी याआधी ‘awe’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. आता त्यांचा हा आगामी ‘हनुमान’ हा चित्रपट हिंदीसह तेलगू. तामिळ, मल्याळम, आणि कन्नड या भाषांमद्येहि प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून बरेच प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.