गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता आज झाली. वेगवेगळ्या चित्रपटांचं या महोत्सवात स्क्रीनिंग झालं. मातब्बर कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच इतरही देशातील प्रतिष्ठित कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. वेगवेगळ्या कलाकारांनी या मंचावर त्यांचं मनोगत आणि चित्रपटसृष्टीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ हा सन्मान तुलूगू सुपरस्टार चिरंजीवी यांना देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यावर चिरंजीवी यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. कित्येकांचे आभार मानत चिरंजीवी यांनी त्यांच्या चित्रपट आणि राजकीय कारकीर्दीविषयी खुलासा केला. राजकारणापेक्षा चित्रपटात रममाण होणं कधीही बरं असंही त्यांनी यावेळीस्पष्ट केलं.
आणखी वाचा : “आता मंदाकिनी हो..” ट्विंकल खन्नानं सांगितली दिग्दर्शकाच्या फर्माईशीची आठवण
चिरंजीवी म्हणाले, “या सन्मानासाठी मी भारत सरकारचे मनापासून आभार मानतो, काही पुरस्कार हे विशेष असतात आणि हा त्यापैकीच एक आहे. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आई वडिलांच्या घरात जन्माला आलो. पण मला लोकांचं प्रेम, प्रसिद्धी, पैसा, नाव हे केवळ या चित्रपटसृष्टीमुळेच मिळालं. मी माझ्या आई वडिलांच्या पोटी शिव शंकर वारा प्रसाद म्हणून जन्माला आलो, पण चित्रपटसृष्टीत चिरंजीवी या नावाने माझा जणू पुनर्जन्मच झाला.”
चित्रपट सोडून राजकारणात जाण्याच्या निर्णयाबद्दल चिरंजीवी म्हणाले, “मी गेली ४५ वर्षं चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. या साडेचार दशकांपैकी एक दशक मी राजकारणात सक्रिय होतो. काही कारणास्तव मला चित्रपटसृष्टीत पुन्हा यावं लागलं. जेव्हा मी पुन्हा आलो तेव्हा पुन्हा प्रेक्षक माझ्यावर तेवढाच प्रेमाचा वर्षाव करतील का याबाबत मी साशंक होतो. पण त्यांच्या मनात माझं स्थान हे अढळ आहे हे मला नंतर समजलं, उलट ते स्थान आणखी बळकट झाल्याचं मला जाणवलं. हेच माझं माझ्या चाहत्यांशी अतूट नातं आहे, मी आज त्यांना वचन देतो की मी पुन्हा कधीच चित्रपटसृष्टी सोडणार नाही.” पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ‘वॉलटेर वीरय्या’ या चित्रपटातून चिरंजीवी मोठ्या पडद्यावर पुन्हा झळकणार आहेत.