गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ वाढली आहे. यामुळे या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली आहे. दक्षिण भारतामध्ये या सुपरस्टार्संना त्यांचे चाहते देव मानतात. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी त्यांचे मोठमोठ्ठे बॅनर्स बनवून त्यांचा दूधाने अभिषेक करतात. ए.जी.रामचंद्रन, एन.टी.रामा राव यांच्यापासून कमल हासन, चिरंजीवी, प्रकाश राज यांच्यापर्यंत अनेक सुपरस्टार्संनी सिनेसृष्टीमध्ये नाव कमावल्यानंतर राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये तेलुगू अभिनेता पवन कल्याण यांचाही समावेश आहे.
पवन कल्याण यांनी त्यांच्या मोठ्या भावाच्या, चिरंजीवी यांच्या ‘प्रजा राज्यम पार्टी’ या पक्षामध्ये सहभाग घेत राजकारणामध्ये पदार्पण केले. पुढे हा पक्ष कॉग्रेसमध्ये विलीन झाला. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी ‘जन सेना पार्टी’ या नव्या पक्षाची स्थापना केली. आंध्रप्रदेश राज्यामधील गुंटूर जिल्ह्यामध्ये रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाअंतर्गत तिथेल स्थानिक नागरिकांची घरे पाडण्यात आली. या नागरिकांची भेट घेण्यासाठी पवन कल्याण त्यांच्या साथीदारांसह पोहोचले होते. चित्रपटातल्या अॅक्शन सीनला लाजवेल असा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा – “ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून हिणवलं…”, जितेंद्र जोशीने केले विकास सावंतचे कौतुक
या व्हिडीओमध्ये पवन कल्याण यांची SUV कार वेगाने रस्त्यावर धावत असल्याचे दिसते. ते या गाडीच्या छतावर पाय ताणून थाटामध्ये आराम करत बसले आहेत आणि त्यांचे बॉडीगार्ड्स व अन्य साथीदार गाडीचे दार पकडून उभे आहेत. या गाडीच्या आजूबाजूला पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या असल्याचेही पाहायला मिळते. त्यांनी या व्हिडीओखाली कमेंट्स देखील केल्या आहेत. पहिल्यांदा पाहिल्यावर हा एखाद्या चित्रपटातील व्हिडीओ आहे असेही वाटते. ‘पॉवर स्टार’ अशी ओळख असणाऱ्या पवन कल्याण यांच्या हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
आणखी वाचा – “रात्री उशिरा पॅकअप झाल्यानंतर…” मराठी अभिनेत्रीने सांगितला मुंबई लोकल प्रवासाचा अनुभव
या व्हायरल व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये काहीजणांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. एका यूजरने “वाहतूकीचे नियम एकत्र मोडले जात आहेत. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नाहीये. हा माणूस पुढारी बनणार आहे”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने “यांच्या प्रभावामुळे आजची तरुण पिढी बिघडत आहे”, असे लिहिले आहे.