एका गडगंज श्रीमंत तरुणाला क्रिकेट खेळण्यात खूप रस आहे. त्याने त्याच्यासारखीच काही टाळकी जमवून एक संघ तयार केला. पैशांच्या जोरावर हा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळेल, अशीही सोय केली. संघातील खेळाडूंची योग्य तयारीच झाली नसल्याने पहिल्याच सामन्यात त्यांचा फज्जा उडाला. अशा वेळी संघ नवोदित होता, म्हणून भागत नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळताना तुमची गुणवत्ता तेवढी तयारीची असावीच लागते. नेमकी हीच गोष्ट ‘तेंडल्या निघाला ऑस्करला’ या चित्रपटाला लागू होते. तब्बल शंभर र्वष जुन्या झालेल्या चित्रपट या माध्यमात संपूर्णपणे नवीन तंत्रज्ञ आणि कलाकार घेऊन निर्मात्याने हा चित्रपट बनवला खरा, पण नावीन्याच्या लेबलाखाली चित्रपटाच्या गुणवत्तेबाबत तडजोड झाली आहे.
या चित्रपटाच्या गोष्टीवरूनच चित्रपटाचा एकंदरीत दर्जा लक्षात येतो. एका गावातील हौशी मंडळी एकत्र येऊन चित्रपट करायचा ठरवतात. गावातल्याच एका हौशी तरुणाला तेंडल्याला दिग्दर्शक करायचं या विचाराने गावकरी हा ध्यास घेतात. गावचे पाटीलच या सगळ्यांच्या मागे असल्याने त्यांना पैशांची ददात नाही. तर असा हा चित्रपट बनवण्यासाठी त्या गावच्या मंडळींना अनेक ‘नस्त्या उठाठेवी’ करायला लागतात आणि ती मंडळी कामधाम सोडून अगदी हौसेनं त्या करतात. अखेर एक अत्यंत दर्जेदार चित्रपट तयार होतो आणि खरा चित्रपटही संपतो.
चित्रपट फक्त तंत्राच्या दृष्टीने नवखा वाटला असता, तर काहीच हरकत नव्हती. पण तो कथेच्या, दिग्दर्शकीय हाताळणीच्या आणि कलाकारांच्या पातळीवरही खूप नवखा राहतो. डान्स बारमधील एक नृत्य कथेत दाखवण्यात आलं आहे. तेंडल्या, पाटील आणि गावातील दोघे नायिका, कॅमेरा, लाइट्स वगैरेच्या शोधात मुंबईत येतात, असा एक प्रसंग चित्रपटात आहे. या वेळी मुंबईत हॉटेलमध्ये राहायला त्यांच्याकडे पैसे नसतात, पण डान्स बारमध्ये नर्तकीवर उडवायला हजारांच्या नोटांची थप्पी यांच्या खिशात कुठून येते, हेदेखील कळत नाही. तेंडल्या नायिकेच्या प्रेमात कसा आणि का पडतो, हेदेखील कोणत्याही दृष्यातून स्पष्ट होत नाही. मात्र गावातील तरुणी राधा त्याच्यावर एकांगी प्रेम करत असते, ते मात्र चित्रपटभर जाणवत राहातं. पण तरीही या चित्रपटात एक धागा आहे. तो धागा दिग्दर्शकाने बरोबर पकडला आहे. मात्र त्या धाग्याभोवती काय आणि कसं गुंफायचं, याबाबत त्याचा गोंधळ झाला आहे. दिग्दर्शकाला थोडीफार तंत्राची माहिती असती तर हा अपघात टळला असता. संकलनाच्या दृष्टीनेही हा चित्रपट खूप तुकडय़ा तुकडय़ांमध्ये तयार झाला आहे. नाटक किंवा एकांकिकेत स्टेजवर ‘मॉण्टाज’च्या माध्यमातून एक आशय लोकांपर्यंत पोहोचवला जातो. या चित्रपटात असे अनेक छोटे छोटे प्रसंग ‘ब्लॅक आऊट’च्या साहाय्याने वेगळे करून निर्थक मॉण्टाज तयार केल्यासारखं वाटतं. कलाकारांच्या बाजूला पाटलांची भूमिका खूप चांगली वठली आहे. त्याशिवाय राधानेही बऱ्यापैकी चांगले काम केले आहे. तेंडल्याच्या प्रमुख भूमिकेतील विनोद रेवाळे याने आणखी थोडी मेहनत घेतली, तर पुढील चित्रपटात तो नक्कीच चांगलं काम करू शकेल. तर चित्रपटातल्या चित्रपटात नायिकेची भूमिका करणाऱ्या श्रद्धा सागांवकर हिने आपल्या उच्चारांकडे लक्ष देण्याची गरज होती. बाकी इतरांनी आपापल्या वकुबानुसार (?) बरी कामं केली आहेत.
तेंडुलकर एण्टरटेन्मेण्ट अ‍ॅण्ड मूव्हीज निर्मित ‘तेंडल्या निघाला ऑस्करला’. दिग्दर्शन- डॉ. शशिकांत डोईफोडे. कथा, पटकथा व संवाद- अश्विनकुमार तेंडुलकर व डॉ. शशिकांत डोईफोडे. छायांकन- नयनीष जाधव. संगीत- पी. निखिल, रसिक मेटांगळे, प्रशांत मग्गीडी आणि सागर सिधान. कलाकार- सर्व नवोदित कलाकारांची फौज.

Story img Loader