गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह विविध शहरात सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. यात ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच समाजमाध्यमांद्वारे लैंगिक छळाच्या घटनांचा समावेश होतो. नुकतंच छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री सायबर बुलिंगची शिकार झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा फोन नंबर सोशल मीडियावर लीक झाला. यानंतर अनेक अनोळखी लोकांनी फोन आणि मेसेज करत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर तिने भावूक होत यावर भाष्य केले आहे.
‘तेरा यार हू मै’ या मालिकेतील अभिनेत्री विभूती ठाकूर ही सायबर बुलिंगची शिकार झाली आहे. नुकतंच एका मुलाखतीत विभूतीने या संपूर्ण प्रकरणावर खुलेपणाने भाष्य केले आहे. हे सर्व कसं घडलं? नेमकं काय झालं? याबाबत मला अजिबात माहिती नाही. तसेच हा नंबर कोणी लीक केला? याचीही मला माहिती नाही. पण हे सर्व फार वाईट आहे, असे सांगत विभूती भावूक झाली.
“मी आता नेल फाइल्स…”, ट्विंकल खन्नाने उडवली विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ची खिल्ली
विभूतीने ‘ई टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केले आहे. यावेळी विभूती म्हणाली, “कालपासून मला वेगवेगळ्या नंबरने फोन आणि मेसेज येत होते. आधी मला वाटलं की कोणीतरी माझ्यासोबत थट्टा मस्करी करत आहे. पण त्यानंतर त्यातील काही विकृत लोकांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली, तेव्हा मात्र मला धक्का बसला. मी भावनिकरित्या खचले. मला मानसिक धक्का बसला. कारण आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही स्थितीचा सामना कधीही केला नव्हता.”
“यानंतर मी एका कॉलरला फोन करुन या सर्व प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी मी त्याला नंबर कुठून मिळाला याबद्दल विचारले. तेव्हा त्याने मला एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तुमचा नंबर मिळाला, असे सांगितले. तसेच त्या संबंधित व्यक्तीनेच माझ्या नंबरवर अशाप्रकारे फोन आणि मेसेज करण्यासाठी सांगितल्याचेही तो म्हणाला. हा सायबर बुलिंगचा प्रकार आहे. यामुळे मी भावनिकरित्या अस्वस्थ झाली आहे”, असेही विभूतीने सांगितले.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विभूतीने सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. “अशाप्रकारे वाईट काम करणारे, अश्लील मेसेज आणि फोन करणाऱ्यांविरोधात मी तक्रार केली आहे. तसेच त्या संबंधित इन्स्टाग्राम पेज ज्याने माझा नंबर लीक केला, त्या पेजविरोधातही मी तक्रार दाखल करणार आहे. सायबर पोलीस यावर नक्कीच कारवाई करतील, याचा मला विश्वास आहे. ज्या लोकांनी माझ्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आणि तसेच माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी”, असे मी या तक्रारीत नमूद केले आहे.
तसेच नुकतंच विभूतीने सायबर सेलचा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यानुसार सायबर सेलने याप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणानंतर विभूतीने तिच्या इन्स्टाग्रामवर त्या इन्स्टापेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. याद्वारे तिने चाहत्यांना आवाहन केले आहे की, कशाप्रकारे हे पेज सार्वजनिकरित्या त्यांचा फोन नंबर शेअर करत आहेत, हे सांगितले आहे. तसेच या पेजविरोधात प्रत्येकाने तक्रार दाखल करावी, असेही तिने म्हटले आहे.