बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर दाक्षिणात्य सिनेमांचा गल्लाभरू हमखास यशस्वी फॉम्र्युला वारंवार नाचविण्याची परंपरा बोनी कपूर या निर्मात्यानेही कायम ठेवत अर्जुन कपूरला ‘लार्जर दॅन लाइफ’ बनविण्याचा प्रयत्न ‘तेवर’ या चित्रपटामार्फत केला आहे. प्रेक्षक आता अशा मसालापट धिंगाणापटांना कंटाळले असले तरी अजूनही बॉलीवूडमध्ये मोठमोठय़ा स्टार कलावंतांना घेऊन मसालापट बनविण्याची अहमहमिका सुरूच असते. त्याचाच नवा अवतार म्हणजे ‘तेवर’ हा चित्रपट होय.
वेगळ्या पठडीतील चित्रपटांची संख्या बॉलीवूडमध्ये वाढत असतानाच हमखास यशस्वी फॉम्र्युलावाल्या चित्रपटांनाही प्रेक्षक अधूनमधून नक्कीच उचलून धरत असतात. निव्वळ दोन घटका करमणूक या नावाखाली अखंड तीन तास हाणामारी, दाक्षिणात्य स्टाईलची धिंगाणाबाज गाणी आणि कोरस आणि त्या जोडीला ढीगभर लोकांना घेऊन नायक-नायिकेचे हिणकस नृत्य म्हणजे जणू तिकीटबारी फुल करण्याचा फॉम्र्युलाच. हाच तद्दन फॉम्र्युला वापरून १५९ मिनिटे इतका लांबलचक सिनेमा दिग्दर्शक अमित रबींद्रनाथ शर्माने अर्जुन कपूर-सोनाक्षी सिन्हा ही जोडी प्रथमच पडद्यावर आणून बनवला आहे. मूळ तामिळ प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला २००३ सालच्या चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘तेवर’मध्ये सबकुछ अर्जुन कपूर असा मामला आहे.
पिंटू ऊर्फ घनश्याम अर्थात अर्जुन कपूर हा आग्रामधील उत्तर भारतीय तरुण म्हणे एक कबड्डीपटू आहे. कबड्डी खेळणे आणि दिवसभर टाइमपास करणे, शक्य झाल्यास कुणाशीतरी मजबूत हाणामारी करून दोन-चार जणांचे थोबाड फोडणे याची पिंटूला उपजतच आवड आहे. त्यामुळे वडील शुक्लाजी अर्थात राज बब्बर एक पोलीस अधिकारी असले तरी आपण गुंडच राहणार आहोत अशाच थाटात पिंटूचा पडद्यावरती वावर प्रेक्षकाला दिसतो.
आता एकदा अर्जुन कपूरला ‘लार्जर दॅन लाइफ’ १९८०-९० मधील सिनेमातल्या नायकासारखे पडद्यावर दाखवायचे हे ठरले असल्यामुळे कथानकही दाक्षिणात्य चित्रपटावरून जसेच्या तसे उचलण्यावर दिग्दर्शकाने भर दिला आहे. आजच्या काळात देशातील कोणत्याही गावात राहणाऱ्या राजकारणी माणसाचा भाऊ केवळ दहशतीच्या जोरावर त्याला आवडणाऱ्या एका तरुणीशी विवाह करू पाहतो ही चावून चोथा झालेली गोष्ट पडद्यावर मांडताना दिग्दर्शकाच्या मनात ही जुनी गोष्ट मांडताना अजिबात कुठलाही नवा विचार सुचलेला नाही हे प्रेक्षकाचे दुर्दैव. अरे हो, खलनायक गजेंद्र सिंग अर्थात मनोज बाजपेयीला नृत्यजलसामध्ये नृत्य करणारी राधिका अर्थात सोनाक्षी सिन्हा दिसते, पाहताक्षणी आपला खलनायक नायिकेवर फिदा. मग गजेंद्र सिंगच्या गुंडगिरी आणि हाणामारी करणाऱ्या माणसाच्या प्रेमात नायिकेने पडावे ही खलनायकाची इच्छा. पण अर्थातच असे घडत नाही म्हटल्यावर लागोपाठ प्रत्येक दृश्यामध्ये आधी नायिकेच्या पत्रकार भावासह अनेकांची हत्या करीत गजेंद्र सिंग पिसाळतो. नायिका-खलनायिका यांच्यामध्ये चुकून नायक पिंटू येतो आणि मग सुरू होतो पाठलागाचा खेळ. आपल्यासारख्या कुख्यात गुंडाला टपली मारून आपल्यासमोर नायिकेला घेऊन जाणारा नायक पाहिल्यावर गजेंद्र सिंग प्रचंड संतापतो आणि सर्वसत्ताधीश असल्यासारखा आपल्या राजकीय नेता असलेल्या भावाच्या मदतीने आग्रा, मथुरा येथील पोलीस यंत्रणा नायक-नायिकेच्या शोधासाठी कामाला लावतो, नाकाबंदी करतो. कबड्डीपटू नायक पिंटू ऊर्फ घनश्याम आणि सर्व काही शक्य असलेला खलनायक बाहुबली गजेंद्र सिंग यांच्यातील लढत, रक्तपात, नाहक गाणी-नृत्य यांचा भडिमार प्रेक्षकाला तीन तास सहन करावा लागतो.
‘तेवर’
निर्माते- बोनी कपूर, संजय कपूर, सुनील लुल्ला, नरेश अग्रवाल, सुनील मनचंदा
दिग्दर्शक- अमित शर्मा
कथा-  गुणाशेखर
पटकथा-संवाद- शंतनू श्रीवास्तव, अमित शर्मा
संगीत- साजिद-वाजिद, इम्रान खान
छायालेखन- लक्ष्मण उतेकर
संकलन- देव राव जाधव
कलावंत- अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्रुती के. हसन, मनोज बाजपेयी, सब्रत दत्ता व अन्य.

सुनील नांदगावकर

Story img Loader