तमिळ सुपरस्टार थलपथी विजय त्याच्या आगामी ‘लिओ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. अखेर ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी निर्मात्यांनी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरला तर प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला लोकांनी डोक्यावर घेतलं. आता मात्र या ट्रेलरमधील थलपती विजयच्या तोंडी असलेल्या एका अपशब्दामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘यू/ए’ प्रमाणपत्र दिलं आहे, पण या एका शब्दावरुन सोशल मीडियावर चांगलंच रान पेटलं आहे.
‘लिओ’च्या ट्रेलरमध्ये एका दृश्यात विजय हा त्रिशाशी भांडताना दिसत आहे. यादरम्यान तिच्याशी बोलताना विजय ‘ट’पासून सुरू होणाऱ्या एका अपशब्दाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात ट्रेलरच्या सब-टायटलमध्ये त्या शब्दाची तीव्रता कमी करण्यात आली आहे. हा जातीवाचक शब्द असल्याने अन् याचा संदर्भ निम्न वर्गातून येणाऱ्या व्यक्तीशी असल्याने तमिळमध्ये तो शब्द एका शिवीप्रमाणे लोकांना खटकला आहे.
या संवादावरुन सोशल मीडियावर दिग्दर्शक लोकेशला आणि खासकरून विजयला प्रेक्षक चांगलंच ट्रोल करत आहेत. विजयचे चित्रपट सर्व स्तरातील वर्गातील लोक, महिला, लहान मुलं पाहतात त्यामुळे विजय कडून अशा शब्दाचा वापर होणं ही अत्यंत बेजबाबदारपणाचं लक्षण असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. चेन्नई, तामिळनाडूसारख्या शहरात या संवादावरुन चांगलाच विरोध होताना दिसत आहे. ट्रेलरमधून तो वादग्रस्त संवाद काढायची विनंतीदेखील केली जात आहे.
‘लिओ’ चित्रपट याआधीही त्यातील ‘ना रेड्डी’ या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या गाण्यात विजय धूम्रपान करताना दिसला होता. हे गाणं धूम्रपान व गुंडगिरीसारख्या प्रवृत्तीला खतपाणी घालत आहे यामुळे या गाण्याविरोधात पोलिसांत तक्रारदेखील करण्यात आली होती. यानंतर या गाण्यात एक डिस्कलेमर देण्यात आला होता.
आधी गाणं आणि आता ट्रेलरमधील संवादामुळे ‘लिओ’ हा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य राज्यात धुमाकूळ घालणार हे नक्की, शिवाय हिंदीतसुद्धा हा चित्रपट सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. ‘लिओ’ १९ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.