Leo Box office collection day 1 : दाक्षिणात्य राज्यांमध्ये रसिक हे त्यांच्या लाडक्या सुपरस्टारच्या चित्रपटावेळी एका सणासारखं सेलिब्रेशन करतात. तमिळ सुपरस्टार थलपथी विजयचा बहुचर्चित ‘लिओ’ हा नुकताच प्रदर्शित झाला असून दाक्षिणात्य राज्यात असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची विजयचे चाहते व चित्रपटप्रेमी फार आतुरतेने वाट बघत होते. एडवांस बुकिंगमध्येही या चित्रपटाने बाजी मारली होती.
नुकतंच ‘लिओ’च्या पहिल्या दिवसांच्या कमाईचे आकडे आणि त्यावरून आलेला रीपोर्ट समोर आला आहे. ‘सॅकनिक’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बुकिंगच्या माध्यमातून ४६ कोटींचा व्यवसाय केला होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या ‘जेलर’ला मागे टाकणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी वाचा : “मुंबईका किंग कौन…” हंसल मेहतांच्या ‘स्कॅम २००३ – तेलगी स्टोरी’च्या पार्ट २ चा टीझर प्रदर्शित
पहिल्याच दिवशी थलपती विजयचा ‘लिओ’ जगभरात मिळून १०० कोटींची कमाई करत धमाकेदार ओपनिंग करू शकतो असं ट्रेड एक्स्पर्ट रमेश बाला यांचा अंदाज आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना ते म्हणाले, “भारतात हा चित्रपट पहिल्याच दिवशी ७० कोटींच्या आसपास कमाई करण्याची शक्यता आहे, परदेशातील कमाई धरून हा चित्रपट एकूण १०० कोटींची कमाई करू शकतो.”
‘लिओ’ हा तमिळ चित्रपटसृष्टीतील जबरदस्त कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो, पण उत्तरेकडील राज्यात मात्र तेवढी जबरदस्त कमाई हा चित्रपट करू शकणार नाही. ओटीटी प्रदर्शनासाठी दिलेल्या नियमावलीनुसार उत्तरेकडील काही राज्यांमध्ये ‘लिओ’ प्रदर्शित झालेला नाही त्यामुळे याचा फटका या चित्रपटाला नक्कीच बसू शकतो.
आणखी वाचा : उदयनिधी स्टॅलिन यांनी दिला थलपती विजयच्या ‘लिओ’चा पहिला रिव्यू; स्पॉयलर दिल्याने चाहते नाराज
गेल्यावर्षी सुपरस्टार अजितच्या चित्रपटासमोर थलपती विजयचा ‘वारीसु’ प्रदर्शित झाला होता ज्याने बॉक्स ऑफिसवर २६.५ कोटींची कमाई पहिल्याच दिवशी केली होती. ‘वारीसु’ने जगभरात २९७.५५ कोटींची कमाई केली होती. ‘लिओ’ हा त्यापेक्षाही जास्त कमाई करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘लिओ’ १९ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला असून यामध्ये थलपती विजयसह तृषा कृष्णन, संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.