भारतातील प्रादेशिक भाषेतील काही चित्रपट इतकी जबरदस्त कमाई करतात की त्याची फक्त देशातच नव्हे तर जगभरात चर्चा होते, असाच एक तमिळ चित्रपट चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार थलपती विजय व अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा एक जुना चित्रपट १० दिवसांपूर्वी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने इतकी जबरदस्त कमाई केली आहे की अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. २० वर्षानंतर २० एप्रिल रोजी ‘घिल्ली’ नावाचा हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने चित्रपटाने नऊ दिवसांत २० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या चित्रपटात थलपती विजयसह त्रिशा कृष्णन, प्रकाश राज आणि आशिष विद्यार्थी यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज होती. २० वर्षांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी सिनेमागृहांमध्ये गर्दी केली. चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की ९ दिवसांत २० कोटी रुपयांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.
१७ एप्रिल २००४ ला हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. त्यावेळीही या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता २० वर्षांनीही चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. ‘सॅकनिल्क’ च्या वृत्तानुसार, २००४ मध्ये जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याने ४० कोटींहून जास्त कमाई केली होती. या चित्रपटाचं बजेट फक्त आठ कोटी रुपये होतं.
पालघरमधील ‘या’ गावात पाणी टंचाई, इरफान खानच्या लेकाने पैसे देऊन केली मदत, व्हिडीओ व्हायरल
‘घिल्ली’ हा २१ व्या शतकात भारतातील सर्वाधिक कमाई करणारा पुन्हा रिलीज झालेला चित्रपट ठरला आहे. ही कामगिरी करत ‘घिल्ली’ ने जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार’ चा (२००९) विक्रम मोडला आहे. चित्रपटाने २०१२ मध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यावर १८ कोटींची कमाई केली होती. तर, १९७५ साली आलेल्या ‘शोले’ चित्रपटाला थ्रीडी व्हर्जनमध्ये २०१३ मध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आलं होतं, तेव्हा या सिनेमाने १३ कोटी रुपये कमावले होते.
‘घिल्ली’ हा चित्रपट २००३ मध्ये आलेल्या तेलुगू ब्लॉकबस्टर ‘ओक्कडू’चा रिमेक आहे, ज्यामध्ये महेश बाबू आणि भूमिका मुख्य भूमिकेत होते.