मागच्या महिन्यामध्ये मणी रत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन भाग १’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाचा सिक्केल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध तमिळ लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्याचा मणी रत्नम यांचा फार पूर्वीपासूनचा मानस होता. कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी कमल हासन यांच्यासह हा चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न देखील केला होता.
‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट दक्षिण भारतातील चोल साम्राज्याच्या भव्य इतिहासावर प्रेरित आहे. चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, तृषा, जयम रवी अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अभिनेता चियान विक्रम या चित्रपटामध्ये आदित्य करिकालन या चोला राजकुमाराच्या भूमिकेत आहे. २०२२ मध्ये त्याचे ‘पोन्नियिन सेल्वन भाग १’, ‘महान’ आणि ‘कोब्रा’ असे चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सध्या तो ‘पोन्नियिन सेल्वन’च्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.
विक्रम सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. दिवाळी निमित्त त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने या टीझर व्हिडीओद्वारे त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विक्रमच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘तंगलान’ (Thangalaan) असे आहे. या चित्रपटामध्ये त्याने एका आदिवासी व्यक्तीचे पात्र साकारले आहे. व्हिडीओमध्ये वाढलेले केस, भरगच्च दाढी, हातामध्ये जाड काठी, कमरेभोवती लंगोट असा त्याचा या चित्रपटामधला पारंपारिक आदिवासी लूक पाहायला मिळतो. चित्रपटाच्या या छोट्या व्हिडीओमध्ये काही इंग्रज अधिकाऱ्यांची झलक पाहायला मिळते.
‘यापेक्षा चांगली दिवाळी असूच शकत नाही..’ असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे. सिनेदिग्दर्शक पा. रंजीत यांच्या विशिष्ट चित्रपट शैलीमधला हा चित्रपट पुढच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या चित्रपटामध्ये विक्रम व्यतिरिक्त मालविका मोहनन आणि पार्वती तिरुवोथु या अभिनेत्री दिसणार आहेत.