बॉलीवूडमधील चित्रपट निर्माता करण जोहरने ट्विटरवरून अनुराग कश्यपचे आभार मानले आहेत. मी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम करावे अशी आपल्या वडिलांची इच्छा होती. अनुराग कश्यपने आपल्याला तशाप्रकारची संधी दिल्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा मला पूर्ण करता आल्याचे करण जोहरने सांगितले. अनुराग कश्यपचे दिग्दर्शन असलेल्या ‘बॉम्बे वेल्व्हेट’ या चित्रपटात करण जोहरने एक पूर्ण लांबीची नकारात्मक भूमिका साकारली आहे. यापूर्वी त्याने ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे’ या चित्रपटात एक लहानशी भूमिका साकारली होती. मात्र, करणने चित्रपटात अभिनेता म्हणून कारकीर्द करावी अशी त्याच्या वडिलांची यश जोहर यांची इच्छा होती. अखेर ‘बॉम्बे वेल्व्हेट’ या चित्रपटामुळे आपल्या वडिलांची इच्छा फलद्रुप होणे शक्य झाल्याचे करण जोहरने सांगितले. याबद्दलच्या भावना ट्विटरवर व्यक्त करताना करणने अनुराग कश्यपचे आभार मानले. तसेच आपण नुकतेच ‘बॉम्बे वेल्व्हेट’चे चित्रीकरण पूर्ण केल्याचे सांगितले. या चित्रपटात करण जोहरच्या बरोबरीने रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.