काही वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘सुरभि’ नावाची मालिका सादर झाली. सिद्धार्थ काक यांच्याबरोबर सूत्रसंचालन करणाऱ्या त्या मुलीचे मनमोकळे हास्य, प्रसन्न चेहरा आणि समोरच्याशी संवाद साधण्याची सहज शैली प्रत्येकाला आपलेसे करून गेली. सतत हसतमुख असणाऱ्या त्या सूत्रसंचालिकेचे नाव होते रेणुका शहाणे. हा कार्यक्रम खूप गाजला.
छोटय़ा पडद्यावर कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर रेणुका हिंदी चित्रपटांकडे वळली. रेणुका शहाणेचा हिंदी चित्रपट म्हटला की ओठावर पटकन नाव येते ‘हम आप के है कौन’ या चित्रपटाचे.
सलमान खान, माधुरी दीक्षित आणि अन्य कलाकारांच्या गर्दीत रेणुकाने आपल्या अभिनयाचा ठसा चित्रपटात उमटविला होता. हिंदीबरोबरच ‘अबोली’ तर काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रिटा’ या चित्रपटात रेणुका दिसली होती. आता रेणुका पुन्हा एकदा ‘ते आठ दिवस’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. शशांक केवले लिखित आणि शाम धानोरकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शेखर प्रधान, श्वेता जाधव, किशोर धारगळकर यांनी केली आहे.
करिअरच्या ध्यासापायी आपल्या अवघ्या एक वर्षांच्या मुलीला सोडून अमेरिकेला गेलेली तरुणी ते मुलीच्या लग्नासाठी मायदेशी परतल्यानंतर निर्माण झालेल्या एका समस्येत घरच्यांचा विरोध पत्करून मुलीच्या पाठीशी  ठामपणे उभी राहणारी आई, अशी भूमिका रेणुका या चित्रपटात साकारत आहे.
हा चित्रपट आठ दिवसात घडणाऱ्या घडामोडींवर बेतलेला आहे. रेणुकासह चित्रपटात तुषार दळवी, अविनाश मसुरेकर, सुहास परांजपे आदी मुख्य भूमिकेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा