गेल्या दीड डझनभर वर्षांत इराणी चित्रपटांना भारतासह जगभरामध्ये भलतीच मागणी आहे. या मागणीची तुलना चीनमधल्या ब्रुस लीच्या मार्शल आर्ट मारामारीच्या चित्रपटांना एकेकाळी होती त्याच्याशी करावी लागेल. फक्त इराणी चित्रपटांवर लिहिताना एतद्देशीय चित्रपट समीक्षकांची विशेषणस्पर्धा लागते, तितकी भावूकता ब्रुस लीच्या सिनेवाटय़ाला कधी गेली नाही. ‘नात्यांचे भावबंद’,‘कोळपलेले बाल्य’, ‘भीषण वास्तवाचे पदर’ , ‘जगण्याचे वास्तव’ अशा अनेक डोळे पाणावणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना घाऊकमध्ये पुरविणाऱ्या इराणी संयत मेलोड्रामा आवडणारे आणि आवडला नाही तरी तसे भासविणारे चित्रपटरसिक फार आहेत. हे सिनेमाप्रेमी तिथल्या दिग्दर्शकांच्या चित्रपट बनविण्याच्या संघर्षकथांनीच इतके भारावून गेलेले असतात की त्यांनी बनविलेली प्रत्येक कृती ही महाकलाकृती म्हणून कौतुकण्यावाचून त्यांच्याजवळ पर्याय उरत नाही. अॅना लिली आमिरपूर या इराणी वंशाच्या अमेरिकी चित्रकर्तीचे सिनेमे पारंपरिक इराणी ओव्हरडोसवर उतारा ठरावेत असे आहेत. ब्रिटनमध्ये जन्मलेली- अमेरिकेत वाढलेली आणि इराणी मुळांना कवटाळत पहिला चित्रपट इराणमध्ये बनविणाऱ्या या दिग्दíशकेच्या नावावर पहिला इराणी व्हॅम्पायरपट बनविल्याचे कर्तृत्व आहे. तीनेक वर्षांपूर्वी आलेल्या ‘ए गर्ल वॉक्स होम अलोन अॅट नाइट’मधील बुरखाधारी नायिका आणि चित्रपटातील दृश्यप्रतिमांवर कौतुकाचा वर्षांव झाला होता. सद्यघडीला चौकटीबाहेरचा आधुनिक विचार करणाऱ्या भावूक बंडखोर दिग्दर्शकांची इराणी फळी इतकी मोठी आहे, की त्यांच्या चौकटीबाहेरच्या विचारांचीच चौकट वाटू लागली आहे. त्या धर्तीवर अॅना लिली आमिरपूरच्या या चित्रपटाने कलात्मक मनोरंजनाचा छान इराणी पायंडा पाडला होता. स्पॅगेटी वेस्टर्न, व्हॅम्पायरपट, न्वार चित्रपट आणि इराणी पारंपरिक सिनेमांमध्ये येणाऱ्या स्त्री दु:खाची धार असे सगळे काही एकाच ठिकाणी भावनांचे अवडंबर न माजवता आणण्याची कला या दिग्दर्शिकेने साधली. यातला व्हॅम्पायर चित्रप्रकार वगळून तिने केलेला ताजा चित्रपट ‘द बॅडबॅच’ हा ‘ए गर्ल वॉक्स होम’ची सुधारित अमेरिकी आवृत्ती आहे. वेगळा काळ, कथा आणि भूमीपटलाचा वापर करून तयार झालेली ही ‘इराणीश अमेरिकी’ निर्मिती पहिल्या चित्रपटाइतकी सरस नाही. तरी त्यातली काही खास वैशिष्टय़े समान असल्याने कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटांच्या सीमारेषेवरची चांगली अनुभूती चित्रपट प्रेक्षकाला देतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा