अभिषेक तेली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवून जात असते. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी कित्येकदा आपल्याकडून नकळतच वाईट मार्गाचासुद्धा अवलंब होतो; परंतु चांगले संस्कार हे आपल्याला वाईट मार्गापासून दूर ठेवतात आणि आपल्यातील समाजभान जागृत करतात. स्वत:च्या वाटय़ाला आलेल्या गोष्टींमधील थोडेसे दुसऱ्याला देऊनसुद्धा आपल्याला आनंद मिळविता येतो, यावर भाष्य करणाऱ्या ‘द बलून’ या मराठी लघुपटाने भारतातील विविध राज्यांमधील लघुपट महोत्सवांमध्ये चमकदार कामगिरी करत ७५ हून अधिक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.

 सातासमुद्रापार जात इंग्लंड, अमेरिका, ब्राझील, ग्रीस, रशिया, बांगलादेश, इटली, जर्मनी आणि टर्की अशा विविध देशांमधील १० चित्रपट महोत्सवांमध्ये या लघुपटाची अधिकृतपणे निवड झाली होती. त्याचसोबत इटली येथे झालेल्या ‘प्रिमावेरा दी ओरीयेंते अ‍ॅवॉर्ड’ सोहळय़ात प्रेक्षकपसंतीचा पुरस्कार आणि डिसेंबर २०२२ मध्ये न्यू जर्सी येथे झालेल्या स्टुडन्ट वर्ल्ड इम्पॅक्ट चित्रपट महोत्सवांत या लघुपटाने तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपटाचा पुरस्कार पटकावला. मुंबईतील गोरेगाव येथे राहणाऱ्या चैतन्य आपटे या तरुणाने या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून पटकथा, संवाद, संकलन, ध्वनिमिश्रण आणि छायाचित्रणाची जबाबदारीसुद्धा स्वत:च सांभाळलेली आहे, तर साहाय्यक डीओपीचे काम क्षितिज भंडारी याने केले आहे.

अंतरिक्ष श्रीवास्तव यांची कथा असलेल्या ‘द बलून’ या लघुपटात चिंटू या लहान मुलाची कथा मांडलेली आहे. कोणतीही गोष्ट भीक न मागता मेहनतीच्या जोरावर प्राप्त करायची, असे संस्कार चिंटूवर बांधकामस्थळी काम करणाऱ्या त्याच्या आईने केलेले असतात. मनोमन फुगा घेण्याची इच्छा असणारा चिंटू पैशांअभावी फुगा घेऊ शकत नाही; पण स्वत:वर झालेल्या चांगल्या संस्कारांचा तो वेळोवेळी अवलंब करतो आणि फुग्यासाठीचे पैसे साठविण्यासाठी मेहनत करतो. याचसोबत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी वेळप्रसंगी त्यांच्या मदतीला कसा धावून जातो, याचे प्रभावी चित्रण ‘द बलून’ या लघुपटातून केलेले आहे. या लघुपटात चिंटूची मुख्य भूमिका साकारणाऱ्या पार्थ बाईत याने आतापर्यंत या भूमिकेसाठी ११ पुरस्कार जिंकले आहेत, तर मनीषा जाधव यांनी साकारलेली आईची भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.

याचसोबत दक्ष बडबे यानेसुद्धा एका लहान मुलाची भूमिका साकारली असून अमोल पवार, राजन काजरोळकर, महेंद्र डोंगरे, स्वाती चव्हाण यांच्यासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका या लघुपटात आहेत. विशेष बाब म्हणजे या लघुपटाचा दिग्दर्शक चैतन्य आपटे याने चित्रपटनिर्मितीचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. तो वाणिज्य शाखेतून पदवीधर आहे. टाळेबंदीच्या काळात त्याने भरपूर चित्रपट पाहिले आणि चित्रपट क्षेत्रासह विशेषत: दिग्दर्शनाकडे तो आकर्षित झाला. यातूनच त्याने चित्रपटनिर्मितीचे सारे ज्ञान आत्मसात केले आणि स्वत:च्या पैशांमध्ये या लघुपटाची निर्मिती केली. या लघुपटासाठी चैतन्यने आतापर्यंत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख चित्रपटकार, सर्वोत्कृष्ट आगामी दिग्दर्शक असे विविध पुरस्कार जिंकले आहेत. ‘तुम्ही जरी चित्रपटनिर्मितीचे शिक्षण घेतले नसले, तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही. जर तुमचे चित्रपट या विषयावर मनापासून प्रेम आणि त्या क्षेत्रात काम करण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच चांगली कलाकृती बनवू शकता,’ असे चैतन्य आपटे सांगतो. ‘द बलून’ हा लघुपट ‘सिक्स सिग्मा फिल्म्स’ या यूटय़ूब वाहिनीवर उपलब्ध आहे. याचसोबत ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वरसुद्धा हा लघुपट प्रसारित करण्यात आला असून प्रेक्षकांची त्याला पसंती मिळते आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The balloon teaches to live with self esteem ysh