मुंबईतील नायगाव येथे ८ ऑगस्ट १९३२ रोजी जन्म झालेल्या कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांची आज ८२वी जयंती. त्यानिमित्ताने या महान विनोदवीराच्या जीवनावर टाकलेला हा कटाक्ष. या दिग्गज अभिनेत्याने आणि चित्रपटकर्त्याने मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ापासून सुरू झालेला ‘त्यांचा’ प्रवास चित्रपटसृष्टीकडे वळला आणि सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमध्ये वावरलेल्या दादा कोंडके यांनी आगळा विक्रम घडविला.
दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले ‘दादा’ म्हणून ओळखले जात असे. ही ‘बिरुदावली’ नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अचानक जाण्याने घर सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. ‘अपना बाजार’ मध्ये दरमहा साठ रुपये पगारावर कामाला असताना दादा सेवा-दलाच्या बँडमध्ये रुजू लागले. परंतु, कलेची आवड त्यांना शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवा दलात असतानाच त्यांची ओळख निळू फुले, राम नगरकर यांच्याशी झाली आणि सेवा दलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे ते अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ‘सोंगाड्या’ (१९७१), ‘आंधळा मारतो डोळा’ (१९७३), ‘पांडू हवालदार’ (१९७५), ‘राम राम गंगाराम’ (१९७७), ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ (१९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते. ‘सोंगाड्या’ ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खूप गाजला व त्यांचा जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली. १९७२ – एकटा जीव सदाशिव, १९७३ – आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ – तुमचं आमचं जमलं, १९७७ – राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ – आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रदर्शित केले.
स्मरणः विनोदवीर दादा कोडके
कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांची आज ८२वी जयंती. त्यांचा जन्म मुंबईतील नायगाव येथे ८ ऑगस्ट १९३२ साली झाला.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 08-08-2014 at 01:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The birth anniversary of dada kondke