बॉलीवूड अभिनेत्री शहाना गोस्वामीची प्रमुख भूमिका असलेला ‘संतोष'(Santosh) हा चित्रपट मोठ्या चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘संतोष’ चित्रपटासाठी अभिनेत्री शहाना गोस्वामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यास बंदी घातली आहे. या चित्रपटासाठी युकेने ऑस्करमध्ये प्रवेशिका दाखल केली होती. या चित्रपटाला ऑस्करमध्ये शॉर्टलिस्टदेखील केले आहे.
ब्रिटीश-भारतीय चित्रपट दिग्दर्शक संध्या सुरी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. उत्तर भारतातील एक विधवा तिच्या पतीच्या निधनानंतर पोलिस दलात त्याच्या जागेवर दाखल होते. त्यानंतर एका दलित तरुण मुलीच्या हत्येचा तपास करते, अशा आशयची या चित्रपटाची कथा आहे. याबरोबरच, पोलिस अधिकांऱ्याकडून होणारे गैरवर्तन, केला जाणारा छळ यावरही हा चित्रपट भाष्य करतो. संध्या सुरी यांचा हा चित्रपट लैंगिक हिंसाचार तसेच जातींवरून भेदभाव यावरही भाष्य करतो. मात्र, या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)कडून सिनेमा प्रदर्शित करण्याची परवानगी नाकारली आहे. पोलिसांची नकारात्मक प्रतिमा यामधून दाखवली जात असल्याने सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रदर्शित करण्यास परवानगी नाकारली आहे.
अभिनेत्री शहाना गोस्वामीने इंडिया टुडेशी संवाद साधला. चित्रपटावर घातलेल्या बंदीबाबत शहाना गोस्वामी म्हणाली, “चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्यामध्ये बदल करण्याची मोठी यादी सेन्सॉरने दिली आहे. सेन्सॉरने सांगितलेले बदल आम्हाला मान्य नाहीत, कारण त्यामुळे चित्रपटातील बहुंताश भाग हा काढून टाकण्यात येईल, त्यामुळे चित्रपटात खूप बदल होतील, म्हणूनच हा चित्रपट भारतात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही अशी स्थिती आहे.”
पुढे शहाना गोस्वामीने चित्रपटाला पटकथेच्या पातळीवर मान्यता मिळाली असताना सिनेमा प्रदर्शित करण्यावेळी अडचणींचा सामना करत असल्याची खंत व्यक्त केली. शहाना गोस्वामी म्हणाली, “ज्या चित्रपटाला पटकथेच्या पातळीवर सेन्सॉरची मंजुरी मिळाली आहे, त्याला भारतात प्रदर्शित करण्यासाठी इतके बदल करावे लागतील हे दुःखद आहे.” तसेच संध्या सुरी यांनी सेन्सॉरच्या या निर्णयामुळे अपेक्षाभंग झाल्याचे म्हटले आहे. तसेच सेन्सॉर जे बदल करण्यास सांगत आहे, ते करणे अशक्य असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले. पुढे त्या म्हणाल्या, “हा चित्रपट भारतात प्रदर्शित व्हावा असे मला वाटते, त्यामुळे यातून काही मार्ग निघत असेल तर मी प्रयत्न करणार आहे.”
काही महिन्यांपूर्वी झालेल्या ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अन् सरटेन रिगार्ड विभागात ‘संतोष’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होता. संपूर्ण जगभरातून चित्रपटाचे कौतुक झाले होते. ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी युकेने ऑस्करमध्ये प्रवेशिका दाखल केली होती. बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात यावर्षी संतोष चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या चित्रपट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले. हा चित्रपट भारतात MUBI या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.