आल्फ्रेड हिचकॉक, के न्टीन टेरेन्टीनो, टॉमी विरकोला, गिआमी डेल टोरो या दिग्दर्शकांनी ‘सायको’, ‘राँग टर्न’, ‘द गर्ल नेक्स्ट डोअर’, ‘एनटीटी’, ‘द हिल्स हॅव आईज’ यांसारख्या दर्जेदार भयपटांची निर्मिती केली. परिणामी चित्रपटगृहात जाऊन भयपट पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. पण जसजसा काळ बदलत गेला तसतसा प्रेक्षकांचा या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलत गेला. सत्तर-ऐंशीच्या दशकात ज्या दृश्यांना पाहून प्रेक्षक घाबरत होते त्यांची विसाव्या शतकात टिंगल उडवली जाऊ लागली. काही मोजके चित्रपट वगळले तर जवळजवळ सर्वच भयपट हे विनोदीपट भासू लागले. दरम्यान, जेम्स वॅन दिग्दर्शित ‘द कॉन्ज्युरिंग’ हा चित्रपट आला आणि त्याने प्रेक्षकांना खरी भीती काय असते, याची जाणीव करून देत भयपटांचे परिमाणच बदलून टाकले. त्यानंतर ‘कॉन्ज्युरिंग’च्याच निर्मात्यांनी ‘इन्सिडन्स चॅप्टर – २’, ‘अॅनाबेले’(२०१४) या दोन चित्रपटांच्या माध्यमातून भयपट आणखी थरारक केले. पुढे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पहिल्या दोन चित्रपटांच्या तुलनेत दुप्पट कमाई करणारा ‘द कॉन्ज्युरिंग २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि आता निर्मात्यांनी भयपटांच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड सेंडबर्ग दिग्दर्शित ‘अॅनाबेले क्रिएशन’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर धुमाकूळ घालतो आहे. प्रेक्षक अक्षरश: चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. ‘द कॉन्ज्युरिंग’ या भयपट मालिके चे वैशिष्टय़ म्हणजे यांत एकच दीर्घकथा घेऊन त्याचे छोटे छोटे भाग करून त्यानुसार एकेक भयपट तयार केले जात आहेत. ‘द कॉन्ज्युरिंग’ची पटकथा ‘अॅनाबेले’ या बाहुलीभोवती फिरते. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांमध्ये त्या बाहुलीची ताकद आणि तिची भयानक कृत्ये दाखवण्यात आली आहेत आणि आता ‘अॅनाबेले क्रिएशन’ या चित्रपटात ती बाहुली नक्की कोण आहे?, या रहस्याचा उलगडा केला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा