सध्या एकामागोमाग एक अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी समन्वय साधून प्रदर्शनाचे नियोजन केल्यास ते उपयुक्त ठरेल. एकाच वेळी भरमसाट चित्रपटांच्या निर्मितीपेक्षा काही दर्जात्मक चित्रपटांची निर्मितीही आर्थिक यश साधण्यासाठी महत्त्वाची ठरते. तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन चित्रपटांची निर्मिती होते, मात्र हे चित्रपट कोण बघतात? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या आशयघन चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली असती, तर आज मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र ओटीटी माध्यम तयार झाले असते, असे बवेश जानवलेकर यांनी सांगितलं.

शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ या आगामी मराठी चित्रपटातील अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री किरण खोजे, प्राजक्ता हनमघर, झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली आणि चित्रपटाबाबत चर्चा केली.

लोकप्रियता जपता आली पाहिजे

मी मनोरंजनसृष्टीत काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा माझ्या कामाचे भरभरून कौतुक केले गेले आणि आपणही सिद्धार्थ जाधवसारखे काम करू शकतो, अशी युवा कलाकारांना स्फूर्ती मिळाली. पण कलाकाराच्या आयुष्यात यशाचे चढते क्षण असतात, तसे अनेक उतारही असतात आणि मी हा काळ अनुभवला आहे. नटांना लोकप्रियतेचा शाप आहे, ही महत्त्वाची गोष्ट माझा भाऊ नेहमी सांगतो. मायबाप रसिक प्रेक्षक तुमचे कौतुकही करतात आणि कधी कधी तुमच्या कामावर टीकाही करतात, असे सांगत कलाकारांना यश – अपयश दोन्ही क्षणांत लोकप्रियता जपता आली पाहिजे, असे स्वानुभवाचे बोल प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याने ऐकवले. तसेच कलाकाराच्या पलीकडे एक माणूस म्हणून माझे पूर्वीचे व आताचे दिसणे, शैली आणि काम अशा विविध गोष्टींवर आजवर बोलल्या गेलेल्या गोष्टी मी सकारात्मकतेने घेतल्या. कोणीही परिपूर्ण नसते, अपूर्ण गोष्टींमधून शिकता आले पाहिजे, असा सल्लाही सिद्धार्थने दिला.

शिक्षणामुळे आत्मविश्वास

मी निवृत्तीच्या वयातील आजोबांची भूमिका कधीही केलेली नव्हती. या वयात आजोबांना दहावीची परीक्षा द्यायची आहे, पण वाढत्या वयामुळे ही परीक्षा द्यायला जमेल का? याचे दडपणही त्याला असते. मात्र शिक्षणालाही वयाची अट नाही, आपण आयुष्यात निरंतर शिकू शकतो. शिक्षणामुळे आत्मविश्वास निर्माण होतो आणि विविध विषयांवर चर्चा करताना आपण निर्भीडपणे व्यक्त होतो, असे भरत जाधव म्हणाले.

वास्तवाला धरून मांडणी

‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट एका कलाकाराची गोष्ट नसून प्रत्येक पात्र मुख्य आहे. झी स्टुडिओज मराठीने एका महत्त्वाच्या वास्तववादी विषयाला हात घालण्याचे धाडस केले आणि लेखक – दिग्दर्शकांनी खोलवर जाऊन कथानक नटवले. शिवराज वायचळ याने स्वत:चा पहिला दिग्दर्शित चित्रपट घेऊन येताना व्यावसायिक विचार केला नाही, तर वास्तवात शिरून ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाला व्यावसायिक स्तरावरील दर्जेदार चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांत भरत जाधव यांनी कौतुक केले.

कथेने कलाकारांना सामावून घेतले

कथा ही ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाची नायक आहे आणि आम्हा सर्व कलाकारांना कथेने सामावून घेतले आहे. एखाद्या दर्जेदार कलाकृतीचा भाग असण्याची गोष्ट तुमच्यासाठी आनंददायी आणि कायम लक्षात ठेवण्यासारखी असते, या पद्धतीचा हा चित्रपट आहे. उत्तम लेखन – दिग्दर्शन, तांत्रिक बाजू आणि निर्मितीमूल्य असलेल्या या चित्रपटातील पात्रं ही वास्तवातील खऱ्याखुऱ्या व्यक्ती वाटतील. कोणीतरी जगलेले प्रेरणादायी आयुष्य ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून आम्ही जगलो आहोत, अशी भावना अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिने व्यक्त केली.

नवीन पद्धतीने जगायला मिळाले

झी स्टुडिओज मराठीबरोबर ‘आता थांबायचं नाय’ या भव्य चित्रपटात काम करण्याची उत्सुकता आणि दडपणही होतं. मी आतापर्यंत गंभीर स्वरूपातील भूमिका केलेल्या आहेत, माझी यातील ‘अप्सरा’ ही व्यक्तिरेखा आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. प्रत्येक भूमिकेतून खूप काही शिकायला मिळतं, असं आपण नेहमी म्हणतो. मात्र या भूमिकेतून मला शिकण्याऐवजी नवीन पद्धतीने जगायला मिळालं आहे, असं अभिनेत्री किरण खोजे हिने सांगितलं.

शब्दांकन : अभिषेक तेली