मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या पट्टीचे चित्रपट तयार केले जातात. प्रत्येक चित्रपटातून काही तरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. मराठी चित्रपटांची ही ‘अर्थ’पूर्ण भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे. तसाच एक चित्रपट आता आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘दृष्टांत’ आहे.
‘दृष्टांत’ हा पहिला मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये सर्व दृष्टिहीन कलाकारांनी काम केले असून मराठी चित्रपटाची परिभाषा बदलताना दिसेल. हे भारतीय चित्रपटाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. केवळ अभिनेतेच नव्हे तर गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन असून या चित्रपटाचे भाग आहेत. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम वेगाने सुरू आहे. जीवनातील महत्व आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे.
चित्रपट बनवण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की, सर्वसामान्य लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि तसेच अवयव दान आणि सामाजिकदृष्ट्या कमी भाग्यवान व्यक्तीला मदत करणे हे आहे.
चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यामध्ये झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा कलाकार अजिंक्य याभोवती चित्रपटाची मुख्य कथा आधारित आहे. या चित्रपटात बबिता, रतन आणि योगेश राव या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट दृष्टिहीन आणि ज्यांना ऐकू येत नाही अशा लोकांना बघता आणि ऐकता येईल याची विशेष काळजी घेतली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी गायन, संगीतकार आणि डबिंगसाठी ही दृष्टिहीन कलाकारांना संधी दिली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित के झांजल यांनी केले आहे. या चित्रपटामुळे सामान्य लोकांना जगाला एका वेगळ्या प्रकारे जाणून घेता येईल. ‘दृष्टांत’ सुद्धा प्रेक्षकांना आपलेसे करेल यात शंका नाही. बीएम प्रॉडक्शन्स आणि पोलराइड मीडिया निर्मित, त्रिपुर सिंग, तन्मय तेलंग आणि हर्षवर्धन हे चित्रपटाचे निर्माते आहेत.