आपली संगीत परंपरा किती ऐश्वर्यसंपन्न आणि प्राचीन आहे, या प्रश्नाचं सोपं उत्तर म्हणजे बासरी हे वाद्य. या वाद्याचा मागोवा घेतला तर आपण थेट महाभारत काळात पोहोचतो. भगवान श्रीकृष्णाने ज्या लीलयेने सुदर्शन चक्र फिरवलं त्याच सहजतेने त्याने बासरीचे मंजुळ सूरही छेडले. ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. आधुनिक काळात पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी या वाद्याला नवे परिमाण दिले. पंडितजींचा शिष्योत्तम म्हणजे पं. रूपक कुलकर्णी. अगदी लहानपणापासून या वाद्याची साधना करणाऱ्या रूपक यांना सध्याचे आघाडीचे बासरीवादक मानले जाते. सारेगम इं. लि. या कंपनीने रूपक कुलकर्णी यांच्या सोलो बासरी वादनाचा ‘द फ्लूटिस्ट’ हा अल्बम रसिकांना सादर केला आहे. संगीताचे असंख्य प्रकार असले तरी शास्त्रीय संगीताच्या पायावरच सर्व गानप्रकाराच्या इमारती उभ्या आहेत. शास्त्रीय संगीत ही केवळ उच्चभ्रूंची आणि जाणकारांची मक्तेदारी आहे, असा एक गैरसमज आहे. मात्र, या मिथकात काहीच तथ्य नसल्याचं या अल्बममधून सिद्ध होतं. या अल्बममध्ये रूपक यांनी दरबारी कानडा आणि भटियाली धून असे केवळ दोन राग वाजविले आहेत. हे दोन्ही राग त्यांनी प्रत्येकी ४० मिनिटे तब्येतीत वाजविल्याने रसिकांना निवांतपणे त्याचा आनंद लुटता येतो. यातील दरबारी कानडा त्यांनी विलंबित एकताल आणि दृत तीनतालात वाजविला आहे. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटगीते या रागावर आधारित असल्याने (संगीतकार रवी यांना या रागाचा मुबलक व प्रभावी वापर केला) त्या गाण्यांच्या स्मृती नकळत जाग्या होतात. या रागाचा थाट तसा श्रीमंती आणि राजेशाही, त्यामुळे तशा थाटाची वातावरणनिर्मिती होते, मात्र त्याच्या सूरांमध्ये वातावरण गंभीर करण्याची क्षमताही आहे. या सर्व छटा अनुभवण्यासारख्याच. रूपक यांनी वाजविलेली भटियाली धूनही दाद देण्यासारखी आहे. आदित्य ओक (हार्मोनियम) आणि आदित्य कल्याणपूर (तबला) या वादकांनी रूपक यांना यथोचित साथ दिली आहे. पं. पन्नालाल घोष आणि पं. हरिप्रसाद चौरासिया या आपल्या गुरूंना रूपक यांनी हा अल्बम समर्पित केला आहे. शास्त्रीय संगीताचा विशुद्ध आणि अत्युच्च आविष्कार अनुभवण्यासाठी हा अल्बम रसिकांनी अवश्य ऐकावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा