आपल्याकडचा चरित्र सिनेमा व्यक्तीला एका देव्हाऱ्यातून काढून दुसऱ्या अधिक भव्य देव्हाऱ्यात बसविण्याचा प्रयत्न करतात. व्यक्तिरेखा इतिहासातील किंवा अर्वाचीन इतिहासातली असली तर तिच्यातले माणूसपण उत्तरोत्तर नष्ट करीत उदात्ततेची टोकाची अवस्था गाठण्याचा आटापिटा चरित्रपटात दिसतो. ते चरित्रपटाऐवजी ‘चारित्र्यपट’ अधिक असतात. याउलट अमेरिकी चित्रपट उद्योगांतील चित्रकर्त्यांच्या भूमिकेमुळे चरित्रपट उदात्तीकरणाच्या माध्यमातून व्यक्तीचे देवपण शोधण्याऐवजी माणूसपण शोधण्यासाठी अधिक धडपडत असतात.
फेसबुक संस्थापक मार्क झकरबर्ग याच्या वयाच्या आतील अब्जोपती होण्याचा प्रवास चितारणारा ‘सोशल नेटवर्क’, हस्लरसारख्या श्लील-अश्लीलतेच्या सीमारेषा झुगारणाऱ्या मासिकाचा संस्थापक लॅरी फ्लिण्ट यांची भूमिका मांडणारा ‘पिपल व्हर्सेस लॅरी फ्लिण्ट’, प्लेबॉय मासिकाच्या मुखपृष्ठावर मेरिलिन मन्रोनंतर झळकलेली बेट्टी पेज हिचा प्रदीर्घ काळ चाललेल्या अश्लीलतेच्या खटल्यावरचा ‘नटोरिअस बेट्टी पेज’, साम्यवाद्यांचा पुरस्कर्ता म्हणून हॉलीवूडमधून बहिष्कार टाकण्यात आलेल्या डाल्टन ट्रम्बो या पटकथाकाराच्या एकललढय़ावरचा ‘ट्रम्बो’, स्टीव्ह जॉब्सच्या उद्यमशील आयुष्यावर डॅनी बॉयल या दिग्दर्शकाने गेल्या वर्षी काढलेला त्याच नावाचा चरित्रपट ही अगदीच निवडक उदाहरणे आहेत. या सर्व उदाहरणांतील व्यक्तिरेखांचा संबंध मुख्यत्वे सर्वव्यापी पोहोचणाऱ्या उत्पादनांच्या उद्योगांशी निगडित आहे. एकाअर्थाने हे चरित्रपट आहेतच, पण त्या व्यक्तींनी समाजात आपल्या कर्तृत्वाच्या बळावर निर्माण केलेल्या साम्राज्याची गोष्ट सांगत असल्यामुळे खऱ्या अर्थाने उद्योगपट आहेत. यंदा ऑस्करने दखल घेतली नसली, तरी अभिनेता मायकेल किटन (बर्डमॅन) आणि दिग्दर्शक जॉन ली हॅनकॉक (ब्लाइंड साइड) यांनी बनविलेला जगातल्या सर्वात मोठय़ा ‘फास्टफूड चेन’ मॅकडॉनल्ड्सवरचा ‘फाऊंडर’ एक यशस्वी उद्योगपट म्हणून गणला जाईल.
दररोज जगातील एक टक्का माणसांना खाऊ घालणाऱ्या मॅकडॉनल्ड्स या आहारयंत्रणेकडे आपल्याकडे शहरी आधुनिकतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. तिच्यावर खुद्द अमेरिकेपासून साऱ्या जगभर टीकाही केली जाते आणि तरीही तिच्याकडे आकृष्ट होणारी नवी पिढी तिचे महत्त्व कमी करीत नाही. या आहारयंत्रणेमध्ये खाणे वा जाणे योग्य की अयोग्य हा मुद्दा सापेक्ष आहे. ‘फाऊंडर’ हा चित्रपट त्याबाबत कसलाही प्रचार करण्याचा प्रयत्न करीत नाही. तो या उद्योगाला जगभरात विस्तारण्यास कारणीभूत ठरलेल्या रे क्रॉक या अट्टल उद्योगी, कल्पनावंत माणसाची गोष्ट सांगतो. मॅक्डॉनल्ड्स भावांनी एका शहरगावापुरते उभारलेले हॅम्बर्गरचे रेस्तराँ सुरुवातीला अमेरिकाभर अन् नंतर जगात पसरविले ते आधी पोटापुरते कमावणाऱ्या मिल्कशेकमेकर सेल्समन रे क्रॉक याने. त्याच्या आत्मचरित्राचा भाग घेऊन हा चित्रपट या उद्योगाच्या भीमकाय रूपाची यशोगाथा मांडतो.
चित्रपटाला सुरुवात होते १९५४ सालापासून. रे क्रॉक (किटन) हा मिल्कशेक मेकरचा विक्रेता विविध गोष्टींनी कातावलेला असतो. त्याच्या यंत्राला हवी तितकी मागणी नसते आणि ठिकठिकाणच्या रेस्तरांमध्ये ऑर्डर केल्यानंतर येणाऱ्या अन्नपदार्थाना लागणारा वेळ सहनशीलतेपलीकडचा असतो. तशातच एका दूरच्या शहरगावात यंत्रविक्रीच्या निमित्ताने झालेल्या भेटीत मॅक मॅकडॉनल्ड्स आणि डिक मॅकडॉनल्ड्स या दोघा भावांनी उभारलेल्या जनप्रिय रेस्तराँ त्याला दिसतो. शिस्तबद्ध रांगा लावत बर्गर घेऊन क्षुधाशांती करणाऱ्या लोकांना पाहून तो मॅक्डॉनल्ड्स भावांसमोर रेस्तराँची साखळी उभारण्याचा विचार मांडतो. सुरुवातीला ते बधत नाहीत, मात्र रे क्रॉकसाठी गुणवत्तेबाबतच्या आणि फायद्याबाबतच्या जाचक अटी लादून रेस्तराँच्या साखळीसाठी तयार होतात. रे बडय़ा गुंतवणूकदारांना सोबत घेऊन साखळी रेस्तराँ उभारतो. मात्र गुणवत्तेमुळे आणि गुंतवणूकदारांच्या मनमानीमुळे तोटय़ाचा सामना रे याला करावा लागतो. स्वत:चे घर आणि संपत्ती गहाण ठेवणारा रे त्यानंतर त्याच्यासारख्याच विचारांच्या मध्यमवर्गीय धडपडय़ा कुटुंबांच्या हाती रेस्तराँची जबाबदारी सोपवतो आणि त्यातून मॅक्डॉनल्ड्सची सारी साखळी रेस्तराँ अभूतपूर्व फायद्यात येतात.
महायुद्धानंतरच्या दहा वर्षांनंतर अमेरिकेत तयार झालेला उद्यमशील काळ चित्रपटात उभारण्यात आला आहे. डेल कार्नेगी यांच्या तत्त्वज्ञानाला अंगिकारून यश पदरी पाडण्यासाठी स्वत:ला पणाला लावणारा रे क्रॉक संपूर्ण चित्रपटात झपाटल्यासारखा दिसतो. रेस्तराँची कल्पना मॅक्डॉनल्ड्स बंधूची असली आणि खऱ्या अर्थाने ते ‘फाऊंडर’ असले तरी सर्वव्यापी बनलेल्या या रेस्तराँचे आजचे ‘युझरफ्रेण्डली’ स्वरूप, त्यातील आबालवृद्धांना आवडणाऱ्या मिल्कशेक, खेळ, कँडीजसारख्या गोष्टींचा अंतर्भाव रे क्रॉकमुळे झाला आहे. आडमुठय़ा मॅक्डॉनल्ड्स भावांकडून विविध क्लृप्त्या लढवत रेस्तराँचा ताबा हिरावून घेणारा रे क्रॉक नायक कसा, असा प्रश्न पडू शकतो. रेस्तराँच्या विकासाचे वेड अंगी भिनलेला रे हाव आणि लालसेच्या सर्वसामान्य दुर्गुणांना चुकत नसल्याचेही चित्रकर्ता योग्यरीत्या मांडून दाखवितो. मॅक्डॉनल्ड्सवर टीका करणाऱ्या कित्येक डॉक्युमेण्ट्रीज उपलब्ध आहेत. पण या उद्योगाची जडणघडण दाखवून देणारा हा चित्रपट त्याच्या साम्राज्यविस्ताराबाबत भरपूर ज्ञान देईल.