दिलीप ठाकूर
तुम्हालाही माहित्येय, अलिकडे दक्षिणेकडील तमिळ, तेलगु चित्रपट या प्रादेशिक भाषांसह हिंदीत डब होऊन सर्वत्र एकाच वेळेस प्रदर्शित होतात. आणि अनेकदा घवघवीत यश मिळवतात. पूर्वी मात्र असे होत नसे. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन यायला बराच अवधी लागे आणि फारच कमी चित्रपट येत. मात्र रिमेकच्या रुपात अनेक तेलगू, तमिळ चित्रपट हिंदीत आले. अनेक चित्रपटात राजेश खन्ना अथवा जीतेंद्र असे. तर काहींमध्ये दक्षिणेकडीलच हीरो. ‘द जंटलमन’ (१९९४) हा चित्रपट देखील त्यातलाच. निर्माता अल्लू अरविंद यांचा याच नावाचा मूळ तमिळ चित्रपट १९९३ सालचा एक सुपर हिट चित्रपट. त्यात अर्जुना सरजा व मधु (‘रोजा’ प्रसिद्ध) अशी जोडी होती. दिग्दर्शक महेश भट्टने हाच ‘द जंटलमन’ हिंदीत साकारताना चिरंजीवी व जुही चावला अशी जोडी जमवली. चिरंजीवीने ‘आज का गुंडाराज’, ‘प्रतिबंध’ अशा काही हिंदी चित्रपटातून भूमिका साकारत यशही मिळवले होते. महेश भट्ट त्या काळात एकाच वेळेस तीन चार चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखला जाई (त्यात एखादा ‘सारांश’ कमालीचा हेलावून टाके. ‘जख्म’ वेगळाच अनुभव देई).

महेश भट्टची व्यावसायिक वृत्ती, दृष्टी इतकी व अशी सुस्पष्ट की मूळ चित्रपटाला फारसा धक्का लावू न देताही तो या रिमेकमध्ये हिंदी चित्रपटाचा रंग देई. येथेच दिग्दर्शक दिसतो. (‘विरासत’मध्ये ते प्रकर्षाने जाणवते.) महेश भट्ट इतक्यावरच थांबला नाही. त्याने कलाकार व गीत-संगीत-नृत्य यातही तो मेळ घातला. चिरंजीवीची नायिका म्हणून जुही चावला. तर त्यासह दक्षिणेकडील हीरा राजगोपाल व रोजा (या नावाची एक अभिनेत्री होती.) या दोघी. त्याशिवाय बॉलीवूडचे राकेश बेदी, लक्ष्मीकांत बेर्डे, हरिशकुमार व परेश रावल. कसा छान समतोल साधलाय ना? मूळ चित्रपटाचा संगीतकार ए. आर. रेहमानच्या दोन गाण्यांच्या चाली कायम ठेवूनच अन्नू मलिकची चार गाणी. गीतलेखन इंदिवर. रेहमानच्या चालीवरची ‘आशिकी मे हरदम…’ व ‘चिक पिका रिका बूम बोले…’ ही गाणी लोकप्रिय झाली. अन्नू मलिकच्या चार गाण्यांपैकी ‘रुप सुहाना लगता है…’ अगदी दक्षिणेकडील चित्रपट संगीतात फिट बसणारे. ‘ए जंटलमन’ म्हणजे केवळ रिमेक नव्हे तर दक्षिणेकडील चित्रपट संस्कृती (मनोरंजन से भरपूर) व हिंदीचा मुखवटा यांचाच जणू मेळ. मुखवटा म्हणजे हा चित्रपट हिंदी वाटणे गरजेचे. यालाच व्यावसायिक युती किंवा आघाडी म्हणतात.