भारतीय प्रेक्षकांसाठी फेब्रुवारी हा महिना निखळ मनोरंजनाचा आहे. कारण, बहुप्रतिक्षित असे बरेचसे चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहेत. राणा डग्गुबती, तापसी पन्नू, के के मेनन, अतुल कुलकर्णी, राहुल सिंग आणि ओम पुरी यांच्या भूमिका असलेला ‘द गाझी अॅटॅक’ हा त्यापैकीच एक चित्रपट आहे. प्रेक्षकांच्या बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर हा चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.६५ कोटी इतकी कमाई केली आहे. पण ही केवळ बॉलीवूडमधील कमाई आहे.
प्रसिद्ध व्यापार आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘द गाझी अॅटॅक’ च्या बॉक्स ऑफिस कमाईचा आकडा ट्विट केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘द गाझी अॅटॅक’ ने शुक्रवारी हिंदी भाषिक व्हर्जनमध्ये १.६५ कोटी रुपयांची कमाई केली. इतर सर्व व्हर्जनमध्ये या चित्रपटाने ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, हिंदी, तेलगू आणि तामिळ या भाषांमध्ये बनवण्यात आलेल्या ‘द गाझी अॅटॅक’ या चित्रपटाचे डिजिटल राइट्स तब्बल १२.५ कोटींना अॅमेझॉन प्राइमने खरेदी केले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘द गाझी अॅटॅक’ चे सर्व भाषांमधले डिजिटल अधिकार हे १२.५ कोटींमध्ये विकण्यात आले आहेत. एका नवोदित दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटासाठी मिळालेली ही फार मोठी रक्कम आहे. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, याबद्दल अधिकृत माहिती घेण्यासाठी निर्मात्यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
#TheGhaziAttack Fri ₹ 1.65 cr. Note: Hindi version… All versions: ₹ 4.25 cr… Excellent word of mouth should ensure a jump in biz.
— taran adarsh (@taran_adarsh) February 18, 2017
इतर चित्रपटांप्रमाणे ‘द गाझी अॅटॅक’ चित्रपटाला देखील स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. या चित्रपटासोबतच हिंदीमध्ये ‘रनिंग शादी’ आणि ‘इरादा’ हे दोन चित्रपट काल प्रदर्शित झाले. तसेच, या स्पर्धेत गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट देखील विसरून कसे चालेल. पण, या सगळ्यात कोणाचा फायदा झाला असेल तर ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री तापसी पन्नू. तापसीने ‘द गाझी अॅटॅक’ आणि ‘रनिंग शादी’ या दोन्ही चित्रपटांमध्ये काम केले आहे.
‘द गाझी अॅटॅक’ हा चित्रपट सत्यघटनेवर आहे. १९७१च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यावेळी विशाखापट्टणमच्या बंदरात असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’वर हल्ला करून ते नष्ट करण्याची योजना पाकिस्तानने आखली होती. आणि त्यांनी या योजनेसाठी दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या ‘गाझी’ या पाणबुडीचा वापर करायचे ठरवले. पाकिस्तानच्या या कारवाईची कुणकुण लागलेल्या नौदल अधिकाऱ्यांनी केवळ ‘सर्च ऑपरेशन’साठी ‘एस २१ – आयएनएस राजपूत’ ही पाणबुडी विशाखापट्टणमजवळच्या समुद्रात तैनात केली. या सर्च ऑपरेशनची तयारी करण्यापूर्वीची नौदल अधिकाऱ्यांची परिस्थिती, त्यांच्यावरचे राजकीय दबाव आणि त्यातून त्यांना घ्यावे लागणारे निर्णय या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. ‘द गाझी अॅटॅक’ हा चित्रपट पूर्णपणे पाणबुडीत घडतो. त्यामुळे पाणबुडीची अंतर्गत रचना, त्यातली कार्यपद्धती, तांत्रिक भाग अशा अनेक गोष्टी चित्रपटात महत्त्वाच्या होत्या. ज्या दिग्दर्शकाने तंतोतंत पाणबुडीचा सेट उभारून पूर्ण केल्या आहेत.