एका काळाशी नाते सांगणारा सुपरस्टार चित्रपट अभिनेता जेव्हा वयात येतो तेव्हा त्याला पाहात मोठी झालेली पिढीही शरीरवयाने म्हातारी झालेली असते. पण त्या सुपरस्टारने कधीच  म्हातारे होऊ नये, अशी त्यांची भाबडी इच्छा असते. परिणामी देव्हाऱ्यात ठेवण्यात आलेले अभिनेते उतारवयात प्रेक्षकांनी खिल्ली उडवेपर्यंत ‘हिरो’च्या भूमिका वठवत राहातात. ‘सारे काही प्रेक्षकांसाठी’ या सबबीखाली हे अभिनेते हिरोपणाची कवचकुंडले काढून फेकून द्यायला तयार नसतात. बॉलीवूडने असे कितीतरी तथाकथित ‘शोमन’, ‘चॉकलेट बॉय’ ‘अँग्री यंग मॅन’ ‘परफेक्शनिस्ट’ नटसम्राट दिले, ज्यांचे उतारवयातील नायकपण हास्यास्पद अवस्थेत पाहायला मिळाले. गेली काही वर्षे हॉलीवूडही बॉलीवूडचा कित्ता गिरवत असल्यासारखे उतारवयातील नायक चित्रपटांत पाहायला मिळत आहे. सिल्व्हस्टर स्टेलॉन, अरनॉल्ड श्वात्झनेगर, निकलस केज, ब्रुस विलीस आदी अभिनेत्यांच्या म्हातारचळी सिनेमांना यावर्षी प्रेक्षकांनीच मोठय़ा प्रमाणात नाकारले. या सगळ्या एकेकाळच्या ए ग्रेड हिरोंच्या निराशादायक कामगिरीच्या कल्ल्यात त्यांच्या काळामध्ये दुय्यम भूमिका वठविणाऱ्या सॅम एलियट नामक पूर्वी उपनायकाच्या भूमिका वठविणाऱ्या कलाकाराचा ‘द हिरो’ हा सिनेमा गाजतोय. वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी हिरोपद गाठून त्याने या भूमिकेचे सोने करून ठेवले आहे. हिरो चित्रपटातला ली हेडन (सॅम एलियट) चाळीस वर्षांपूर्वी ‘द हिरो’ या वेस्टर्न चित्रपटामुळे सुपरस्टारपदी पोहोचलेला असतो. या एका भूमिकेने त्याला संपत्ती-ऐश्वर्य आणि सारे काही दिले असते. त्या हिरोपणाचे ओझे घेऊन तो सांस्कृतिक आणि सामाजिकरीत्या तो अजूनही जगत असतो. फक्त पूर्वीच्या आयुष्याशी फरक इतकाच असतो की आता त्याच्याजवळ जीवघेणा आजार असतो, सोबतीला नातेवाईकांपासून कुणीच नसते आणि फुटकळ जाहिरातींसाठी आपला करारी आवाज देण्यापलीकडे त्याच्याकडे काम उरलेले नसते.

तो मद्य आणि ड्रग्जच्या पूर्णपणे आहारी गेलेला असतो. आताशा काम मिळत नसते, तरी जीवनगौरव वगैरे पुरस्कार मात्र मिळत असतो. आपल्या आजाराबाबत कळताक्षणी घटस्फोटिता कलाकार पत्नी आणि मुलीपर्यंत तो ही गोष्ट पोहोचवू शकत नाही. आपला टीव्ही मालिकेमध्ये सोबत काम केलेला एकुलता एक (ड्रगडीलर असलेला) मित्र याच्याशी गप्पा आणि त्याच्याकडून अमली पदार्थाची खरेदी हा दिनक्रमाचा भाग बनलेला ली आपले चित्रपटातील हिरोपण जिवंत  ठेवून असतो. या मित्राच्या घरीच त्याची शार्लटशी (लॉरा प्रेपॉन) ओळख होते. आगापिछा नसलेली ही शार्लट लीच्या निमंत्रणावरून त्याच्यासोबत जीवनगौरव पुरस्काराच्या सोहळ्यामध्ये सामील होते. पुरस्कार सोहळ्यामध्ये स्वत:ची अन् जीवनगौरव पुरस्काराचीच खिल्ली उडविणाऱ्या ली याची व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होते. विसरलेल्या जगाचे अचानक या हिरोकडे पुन्हा लक्ष जाते आणि त्याच्याकडे कामाचे नवे प्रस्ताव येऊ लागतात. मरणपंथाला लागलेला ली या दरम्यान वयाने निम्म्याहून अधिक असलेल्या शार्लटशी पर्याप्त रोमान्स साजरा करतो आणि आयुष्याच्या संध्याकाळचा सोहळा अनुभवण्यासाठी सज्ज होतो.

चित्रपटात प्रेक्षकशरण रोचक प्रसंग नाहीत. हिरोपणा सिद्ध करणाऱ्या पुरुषार्थदर्शक घटना नाहीत किंवा भूतकाळातील चित्रपटांच्या व्यक्तिरेखेची भलामण करणारे प्रसंग नाहीत. चित्रपटातील नायकपण सोबत जगणाऱ्या साऱ्याच अभिनेत्यांची शोकांतिका सॅम एलियटने जोरकसपणे साकारली आहे. ली याला सातत्याने पडणाऱ्या स्वप्नांत त्याच्यातील  सजग, स्मार्ट, नरपुंगव हिरो दिसतो. परंतु त्या काऊबॉय हिरोचा चेहरा म्हातारपणातलाच दिसतो. त्याचे कल्पित स्वप्नाळू आणि वास्तव हिरोपदाचे स्वप्न अनेकदा आपल्याला दाखविले जाते. शार्लेटचे त्याच्या आयुष्यात येणे ही अमूलाग्र बदल करणारी वगैरे घटना नसते. त्याचे आयुष्य ज्या संथ आणि निर्थकपणे सुरू असते, त्याचा वेग कोणत्याही प्रकारे बदलण्याचा प्रयत्न केला जात नाही.

चित्रपटाचा शोध आहे तो चित्रपटातील खोटय़ा आयुष्याची प्रतिमा वाहवत नेणाऱ्या नायक किंवा सुपरस्टारच्या वास्तव आयुष्याचा धागा पकडण्याचा. कालबाह्य़ होणे, लोकांच्या विस्मृतीत जाणे, शरीराचा अंत जवळ येणे याकडे कुण्या एकेकाळी लोकांच्या दृष्टीने सुपरहिरोसमान असलेला नायक कसा पाहतो, त्याला कोणते दु:ख होते, याचा वास्तव आविष्कार येथे दाखविण्यात आला आहे. यात टीव्हीमध्ये दाखविले जाणारे संदर्भ, पात्रांच्या तोंडी दिला जाणारा संवादही त्याअनुरूपच घेण्यात आला आहे. उदा. ली याचा ड्रगडिलर मित्र टीव्हीवर बस्टर किटन या चार्ली चॅपलीन काळातच लोकप्रिय असलेल्या परंतु कालौघात विस्मृतीत गेलेल्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहताना दाखविला आहे. हे आणि असे कितीतरी संदर्भ आपल्याला नायकपणाचे दु:ख दर्शवून देणारे आहेत.

आजच्या काळात कालहत झालेल्या नायकाच्या वाढदिवसावर कविता वगैरे करून किंवा त्याला समाजमाध्यमांच्या देव्हाऱ्यात पूजत चाहतेपण साजरे करणाऱ्या आपल्या या पिढीला नायकपणाचे दु:ख एरव्ही कदाचित कधीचकळणार नाही. हिरोसारख्या सिनेमांमधून त्याची थोडी जाणीव मात्र होऊ शकेल.