छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय विनोदी कलाकार किकू शारदा. तो अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या तो ‘द कपिल शर्मा शो’मधून घराघरात पोहोचला आहे. त्याचा मुलगाही त्याच्याप्रमाणेच कलाकार असल्याचं त्याच्या एका व्हिडिओतून दिसून येत आहे. कपिल शर्मा आणि अभिनेता मनोज वाजपेयी यांनीही किकूच्या मुलाचं त्याचा हा व्हिडिओ पाहून कौतुक केलं आहे.

किकू शारदाचा मुलगा शौर्य शारदा याने एक रॅप गायलं आहे आणि त्याचा व्हिडिओ युट्युबला अपलोड केला आहे. शौर्यचा हा व्हिडिओ त्याचे वडील आणि अभिनेता किकू शारदाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, “माझ्या १२ वर्षांच्या मुलाचं गाणं शेअर करत आहे. त्याला प्रेम द्या.”

शौर्यचा हा व्हिडिओ पाहून किकूचा सहकलाकार कपिल शर्माने त्याच्या ह्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. तो म्हणतो, “हे खूपच सुंदर आहे, किक्स. शौर्यला सांग की आम्हाला त्याचा अभिमान आहे. प्रेम आणि टॅलेंट कितीही लपवलं तरी लपत नाही. तो रॉकस्टार आहे.”

अभिनेता मनोज वाजपेयीनेही शौर्यचं कौतुक केलं आहे. तो म्हणतो, “व्वा, तुझ्या घरात खरंच टॅलेंट आहे. तुझ्या छोटूला खूप शुभेच्छा”. अभिनेता हितेन तेजवानीनेही किकूच्या मुलाचं कौतुक केलं आहे आणि त्याचा व्हिडिओ फारच आवडल्याचंही सांगितलं आहे.

कपिल लवकरच आपला शो एका नव्या रुपात घेऊन येत आहे. या शोमध्ये किकूही असणार आहे. मुलाच्या जन्मामुळे कपिल सध्या पॅटर्निटी ब्रेकवर आहे. तो सध्या नेटफ्लिक्सच्या एका वेब शोमध्येही काम करत आहे. त्याबद्दल अधिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
किकू आणि कपिल अनेक वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर अभिनेता सुनील ग्रोवरसोबत इतरही काही कलाकार शो सोडून गेले. मात्र किकूने शो न सोडण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader