प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. या शोच्या मंचावर नेहमीच वेगवेगळे सेलिब्रेटी आपले चित्रपट किंवा नव्या शोच्या प्रमोशनसाठी हजेरी लावताना दिसतात आणि कपिल शर्मा देखील त्यांच्यासोबत धम्माल करताना दिसतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं कपिलला मराठी बोलता येत नाही म्हणून चांगलंच सुनावलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
सोनी टीव्हीनं नुकत्याच रिलीज केलेल्या नव्या प्रोमोमध्ये अभिनेता रवि किशन, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. कपिल शर्मा या तिघांचंही स्वागत करताना दिसतो. यावेळी सोनाली कुलकर्णी कपिलला म्हणते की, ‘एवढ्या चित्रपटात काम करूनही याआधी मला या शोच्या मंचावर येण्याची संधी मिळाली नाही.’ त्यावर, ‘तू या मंचावर आलीस हे माझं सौभाग्य आहे’ असं कपिल सोनालीला म्हणतो.
कपिलच्या याच बोलण्यावर प्रतिक्रिया देताना सोनाली त्याला म्हणते, ‘कपिल तू फक्त हिंदी- इंग्लिशमध्येच बोलणार आहेस का? थोडं मराठीतूनही बोल.’ त्यावर कपिल सांगतो की, त्याला मराठी येत नाही. कपिलच्या या बोलण्यावर सोनाली उत्तरते, ‘मुंबईमध्ये राहूनही तुला मराठी येत नाही. अनेक कलाकार आहेत ज्यांना चांगलं मराठी येतं.’ यानंतर कपिल पंजाबी बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो की, ‘सोनाली तू मघापासून बोलतेयस, मला काही बोलण्याची संधीच देत नाही आहेस.’
यावर सोनाली म्हणाते, ‘तू ज्या ठिकाणी राहतोस तिथली भाषा तुला बोलता आली पाहिजे.’ सोनालीचं बोलणं थांबवत कपिल तिला म्हणतो, ‘मी तुझ्याशी सहमत आहे.’ कपिल शर्मा शोमध्ये हे सर्व कलाकार ‘व्हिसलब्लोअर’च्या प्रमोशनसाठी आले होते आणि नेहमीच सर्वांवर भारी पडणाऱ्या कपिल शर्मावर यावेळी मात्र सोनालीच भारी पडली. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि रविकिशन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेबसीरिजची कथा २०१३ साली मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या घोटाळ्यावर आधारित आहे.