दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. अगदी प्रेक्षकांपासून ते सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. चित्रपटाचं जेवढं कौतुक झालं तेवढेच वादही झाले. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांचं स्थलांतर यावर आधारित असलेला हा चित्रपट आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. या चित्रपटावर मुस्लीमविरोधी, एका राजकीय विचारधारणेशी संबंधित किंवा चुकीच्या गोष्टी पसरवत असल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर आता विकिपीडियावर या चित्रपटाबाबत अशी काही माहिती देण्यात आली आहे. ज्यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री संतापले आहेत. एका ट्वीटमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काय लिहिलंय विकिपीडियावर?
या चित्रपटाबद्दल देण्यात आलेल्या माहितीमध्ये विकिपीडियावर लिहिण्यात आलंय की, ‘द कश्मीर फाइल्स हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट असून याचं दिग्दर्शक आणि लेखन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात काश्मिरच्या वादग्रस्त भागातील काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि विस्थापनाची काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे. १९९० मध्ये काश्मिरमध्ये झालेल्या नरसंहाराची ही कथा आहे. जे एक ठरवून केलेलं षडयंत्र असल्याचं मानलं जातं. यावरच हा चित्रपट आधारित आहे.’

आणखी वाचा- अजान- हनुमान चालीसा वादावर गायक अनुप जलोटा यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

विवेक अग्निहोत्री भडकले
विकिपीडियावर चित्रपटाबाबत देण्यात आलेल्या या माहितीवर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या माहितीचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करत एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘अरे यात तर तुम्ही इस्लामविरोधी, प्रोपेगंडा, संघप्रचारक आणि कट्टरतावादी हे शब्द जोडणं तर विसरूनच गेलात. तुम्ही तुमची धर्मनिरपेक्षतेची ओळख विसरत चालले आहात. यात वेळीच योग्य ते बदल करावेत.’

आणखी वाचा- Video : रुग्णालयातून घरी परतलेल्या धर्मेंद्र यांचा व्हिडीओ चर्चेत, म्हणाले “पुन्हा असं काही…”

दरम्यान अनेक वाद होऊनही प्रेक्षकांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला खूपच पसंती दिली होती. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर आणि पल्लवी जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा गल्ला पार केला होता. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ‘द दिल्ली फाइल्स’ या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांचा हा चित्रपट १९८४ मध्ये दिल्लीत सीख समुदायाच्या विरोधात झालेल्या दंगलीवर आधारित असणार आहे. मात्र काही संघटनांनी या चित्रपटाला विरोधही दर्शवला आहे.