दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींची कमाई केली आहे. सर्वत्र सध्या या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटानंतर अनेकांनी त्यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान या चित्रपटाच्या यशानंतर आता लवकरच विवेक अग्निहोत्री दिल्लीच्या दंगलीवर चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
द कश्मीर फाइल्सवरुन होणाऱ्या टीकांवर विवेक अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, “मी इथे कोणाला काहीही चुकीचे सांगण्यासाठी किंवा कोणाचा पराभव करण्यासाठी आलो नाही. आम्ही स्वतःचे चित्रपट स्वत: बनवतो. आम्ही बॉलिवूडच्या बाहेर आहोत. खरं तर आपण बॉलिवूडच्या अगदी विरुद्ध आहोत. आम्ही स्वतंत्र चित्रपट निर्माते आहोत. त्यामुळे चित्रपटाची कोणी प्रशंसा केली किंवा नाही याचा मला काहीही फरक पडत नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की काही प्रभावशाली लोकांना खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण प्रचाराद्वारे माझा चित्रपट खराब करायचा आहे.”
“मला टॅलेंटेड लोकांसोबत क्रिएटिव्ह काम करायचे आहे. जर मी एखाद्या मोठ्या स्टारसोबत काम केले तर मी फार मोठा आहे, असे मानले जाते. पण जर मी तसेच करत नसेल तर मी काहीही करत नाही, अशी समज निर्माण होते. तू काहीच नाहीस, असे मानले जाते आणि मला फक्त ही मानसिकता मोडून व्यवस्थेला आव्हान द्यायचे होते”, असेही विवेक अग्निहोत्री म्हणाले.
दरम्यान सध्या तुम्ही कोणत्या विषयावर चित्रपटाची निर्मिती करत आहात, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “आम्ही सध्या ‘द दिल्ली फाइल्स’ हा चित्रपट बनवत आहोत. हा चित्रपट एक वेबसीरिज असेल. हा चित्रपट दिल्लीत झालेल्या दंगलीवर अवलंबून असेल. पण या चित्रपटासाठी आम्हाला निर्मात्याची आवश्यकता आहे. तो आपला इतिहास आणि वारसा आहे. त्यामुळे कोणत्याही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने या मुद्द्यावर चित्रपट करायला हवा.”