दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. या चित्रपटात १९९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे देशभरातून कौतुक होत आहे. त्यात आता एका लेखकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काश्मिरी पंडितांची माफी मागितली आहे. जावेद बेग नावाच्या या काश्मिरी लेखकाने मान्य केले की तो काळ खूप भयावह होता. त्यावेळी अनेक गुन्हे घडले होते आणि त्याने हे सगळं स्वत: पाहिल आहे.
जावेद बेग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “त्यांच्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या आहेत, आजच्या तरुणांनी ती चूक मान्य करायला हवी. काश्मिरी पंडितांना मारणारे आमच्याच वस्तीतील लोक आमच्याच घरातील असल्याचे जावेद बेग म्हणाले. काश्मिरी पंडित हे काही परके नाहीत.” बेग म्हणाले की, “काश्मिरी पंडित हे आपल्याच रक्ता-नात्याचे आणि समाजाचे आहेत. जनावरदेखील त्यांच्या समुदायातील जनावरांसोबत असे कृत्य करत नाहीत. वाघ कधीच वाघाचा शिकार करत नाही. निदान आज तरी आपल्याला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. मी स्वत: या हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी आहे. काश्मिरी पंडीत निर्दोष होते.”
बेग यांनी यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओत ते एका काश्मिरी न्यूज चॅनलशी चर्चा करताना दिसत आहेत. यावेळी ते काश्मिरी पंडित, काश्मिरी पंडित गिरीज टिकू आणि काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरनाविषयी भाष्य केले आहे. काश्मिरी मुस्लिमांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली हातात शस्त्रे घेतली, हे सत्य आहे यात कोणत्याही प्रकारचा प्रोपोगेंडा ( Propaganda) नाही. सत्य हे सत्य राहणार, कोणी मान्य करो किंवा नको.
आणखी वाचा : “आम्हाला आता माहित झालं…”, अमिताभ यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर केली Cryptic पोस्ट?
दरम्यान, हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.