सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तुफान चर्चा आहे. राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही सतत बातम्यांचा विषय ठरत आहेत. या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. असं असतानाच आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटासंदर्भात एका खास गोष्टीचा खुलासा केलाय. भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर या ‘द कश्मीर फाइल्स’साठी विशेष गाणं गाणार होत्या, मात्र करोनामुळे हे शक्य झालं नाही असा दावा विवेक अग्निहोत्रींनी केलाय.
विवेक अग्निहोत्री यांनी ईटाइम्सशी बोलताना लता मंगेशकर या चित्रपटामध्ये गाणार होत्या अशी माहिती दिली. “द कश्मीर फाइल्समध्ये एकही गाणं नाहीय हे फार वाईट आहे. कथा चांगली असून हा चित्रपटमध्ये त्या हत्याकांडामध्ये बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे. मी खरं तर या चित्रपटासाठी एक बोली भाषेतील गाणं काश्मिरी गायकेकडून रेकॉर्ड करुन घेतलं होतं. लतादिदींनी ते गाणं गावं अशी आमची इच्छा होता. त्यांनी बऱ्याच काळापूर्वी चित्रपटांमध्ये गाणं बंद केलं होतं. त्या पार्श्वगायनामधून निवृत्त झाल्या होत्या पण आम्ही त्यांना विनंती केलेली. त्यांचे पल्लवीशी (पल्लवी जोशी) फार चांगले संबंध होतं. त्यांनी आमच्या चित्रपटासाठी गाण्याची तयारीही दर्शवली. काश्मीर त्यांनाही फार प्रिय होता. करोनाची लाट ओसरुन गेल्यानंतर आपण गाणं गाऊ असं त्या म्हणाल्या होत्या,” अशी माहिती विवेक अग्निहोत्रींनी दिली. “त्या स्टुडिओमध्येही जायच्या नाहीत. त्यामुळेच आम्ही या रेकॉर्डींगसाठी वाट पाहत होतो. पण अचानक हे सारं घडलं, (त्यांचा मृत्यू झाला) त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं,” अशी खंतही विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केलीय.
लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झालं. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तबकडीच्या रेकॉर्डयुगापासून ते कॅसेटरिळांची बेगमी करणारे दर्दी आणि चकचकत्या सीडीजगतापासून ते चावीसम पेनड्राईव्हमधून संगीताचे चलन-वहन करणाऱ्या आजच्या भिरभिरत्या कानसेनांना स्वरांनी समृद्ध करणाऱ्या लतादीदींच्या निधनामुळे जगभरातील संगीतप्रेमींनी शोक व्यक्त केला होता.
लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती.