दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आणि सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय. अगदी सामान्य प्रेक्षक, समीक्षक यांच्यापासून ते थेट बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी या चित्रपटावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. अशातच आता गीतकार मनोज मुंतशिर यांचं या चित्रपटाबाबतचं ट्वीट चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज मुंतशिर यांच्या मते हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर व्यक्त न होणं खूपच चुकीचं ठरेल. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर आपलं मत मांडलं आहे. मनोज यांनी आपल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. या मुलाखतीत त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर भाष्य केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘दुसऱ्यांचे चित्रपट तर सोडाच पण मी स्वतःचे चित्रपट प्रमोट करतानाही विचार करतो. पण ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर त्यावर न बोलणं चुकीचं ठरेल म्हणून बोलतोय.’ ते या व्हिडीओमध्ये सांगतात, ‘या चित्रपटानं अनेक लोकांना भावुक केलं आहे. ९० च्या दशकात काश्मीरमधून दीड लाख काश्मिरी पंडितांना पलायन करावं लागलं. त्यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली.’

आणखी वाचा- प्रभासच्या ‘राधे श्याम’वर The Kashmir Files पडला भारी, तिसऱ्या दिवशी चित्रपटानं केली एवढी कमाई

मनोज आपल्या मुलाखतीत पुढे सांगतात, ‘यावेळी दिल्लीतील सरकार झोपा काढत होतं. या विषयावर काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता. मात्र तो पाहिल्यानंतर जे लोक या त्रासातून गेले आहे त्यांना संताप अनावर झाला होता. कारण त्यात खरी कहाणी दाखवण्यात आली नव्हती. खऱ्या कथेला पूर्णतः सॅनेटाइझ करण्यात आलं होतं. त्रासदायक इतिहास स्वीकारून कधीच मैत्री होऊ शकत नाही. जेव्हा तुमच्या आमच्यातील जो खरा इतिहास आहे, ज्या समस्या आहेत यावर भाष्य केलं गेलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. जर तुम्हाला यावर न बोलता या सर्व गोष्टी झाकून टाकायच्या असतील, त्यावर माती टाकायची असेल तर असं होऊ शकत नाही.’

आणखी वाचा- होळीच्या रंगांमध्ये यश- नेहाच्या प्रेमाला चढणार रंग, मालिकेत येणार नवा ट्विस्ट!

विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक करताना मनोज मुंतशिर म्हणाले, ‘विवेक अग्निहोत्री यांना माझा प्रणाम. कारण त्यांनी ही कथा जशीच्या तशी मोठ्या पडद्यावर मांडण्याचं साहस दाखवलं. अर्थात असं करण्याचे परिणाम तो भोगतोय. तो माझा मित्र आहे त्यामुळे मला माहीत आहे. त्यानं हा चित्रपट प्रसिद्धीसाठी तयार केलेला नाही. चित्रपटाच्या कथेसाठी त्यानं हा चित्रपट तयार केला पण याचे परिणाम त्याला पुढेही कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावे लागणार आहेत. पण तो धाडसी आहे कारण त्यानं हा चित्रपट तयार करण्याची हिंमत दाखवली. आगामी काळात अशा प्रकारच्या कथा येतील. कारण पूर्वी आम्ही यावर बोलायला घाबरत होतो पण आता अभिमानानं यावर भाष्य करतोय.’

आणखी वाचा- घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं सोडलं मौन, सांगितलं १५ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट ९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केलं आहे. ज्याचं सध्या खूप कौतुक होताना दिसतंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kashmir files manoj muntashir reacts on vivek agnihotri film tweet goes viral mrj