देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट तिकीटबारीवर नवीन नवीन विक्रम करत असतानाच दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. मात्र या चित्रपटावरुन राजकीय समर्थकांनुसार दोन गट पडल्याचं चित्र दिसतंय.
चित्रपट उत्तम असल्याचं मत भाजपा समर्थकांचं म्हणणं आहे तर विरोधी पक्षाचं समर्थन करणाऱ्या अनेकांनी हा चित्रपट म्हणजे प्रपोगांडाचा भाग असल्याची टीका केलीय. असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या चित्रपटाचं कौतुक केलं असून यामधून सत्य दाखवण्यात आल्याचं म्हटलंय. देशहितासाठी सत्य समोर आलं पाहिजे असंही मोदी या चित्रपटाबद्दल बोलताना म्हटलंय. हाच धागा पकडून एका दिग्दर्शकाने थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला आव्हान करत ‘गुजरात फाइल्स’ चित्रपट मी निर्माण करतो, तुम्ही फक्त तो प्रदर्शित करायची परवानगी देण्याची हमी द्यावी असं म्हटलंय.
नक्की वाचा >> Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”
नेमकं कोणी काय काय म्हटलंय?
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापरी यांनी ट्विटवरुन गुजरात फाइल्स चित्रपट बनवण्यास आपण तयार असल्याचं म्हटलंय. “गुजरात फाइल्स नावाचा मी ‘तथ्यांवर तसेच कलेवर आधारित’ चित्रपट बनवण्यास तयार आहे. यामध्ये तुमच्या भूमिकेचाही ‘सत्यतेने’ आणि सविस्तर उल्लेख असेल. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून तुम्ही थांबवणार असं आश्वासन नरेंद्र मोदीजी तुम्ही मला आज देशासमोर देऊ शकता का?”, असा प्रश्न कापरी यांनी पंतप्रधांना ट्विटमध्ये टॅग करुन विचारलाय.
नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”
निर्मातेही तयार फक्त…
त्यानंतर काही तासांनी कापरी यांनी पुन्हा एक ट्विट केलं असून काही निर्मात्यांनी आपल्यासोबत ‘गुजरात फाइल्स’वर काम करण्याची तयारी दर्शवल्याचं म्हटलंय. “माझ्या या ट्विटनंतर काही निर्मात्यांसोबत माझं बोलणं झालं. ते गुजरात फाइल्सची निर्मिती करण्यासाठी तयार आहेत. त्यांना केवळ एवढं आश्वासन हवं आहे की ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बोलत आहेत तेच स्वातंत्र्य या चित्रपटाला दिलं जाईल,” असं कापरी यांनी म्हटलंय.
पंतप्रधान ‘द कश्मीर फाइल्स’संदर्भात नेमकं काय म्हणाले?
दिल्लीमध्ये मंगळवारी (१५ मार्च २०२२ रोजी) पार पडलेल्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी सत्य गोष्टी समोर आल्या पाहिजेत हे सांगताना ‘द कश्मीर फाइल्स’ आणि त्याला होणाऱ्या विरोधाचं उदाहरण दिलं. मोदींनी या चित्रपटाला विरोध करणारे लोक इतर वेळेस अभिव्यक्ती स्वासंत्र्याचे झेंडे घेऊन मिरवत असतात असा टोलाही लगावला. “तुम्ही सध्या पाहिलं असेल की ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. जे लोक नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन फिरतात, ती पूर्ण जमात मागील पाच-सहा दिवसांपासून खवळलेली आहे,” असा टोला मोदींनी लगावला.
“सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न…”
“तथ्य आणि कला म्हणून या चित्रपटाचे विवेचन करण्याऐवजी त्याचं श्रेय हेरावून घेण्यासाठी एक मोहीम सुरु करण्यात आलीय. तुम्ही पाहिलं असेल, यासाठी एक पूर्ण इकोसिस्टीम काम करतेय. सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय,” असं पंतप्रधान या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले.
नक्की वाचा >> The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…”
“सत्य वाटलं ते सादर केलं…”
तसेच पुढे बोलताना पंतप्रधानांनी, “त्याला (निर्माता, दिग्दर्शकाला) जे सत्य वाटलं ते त्याने सादर करण्याचा प्रयत्न केला. पण त्या सत्याला न समजण्याची तयारी, ना स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे. उलट जगाने हा (चित्रपट) पाहू नये असे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या पद्धतीचे षडयंत्र मागील पाच-सहा दिवसांपासून सुरु आहे,” असं म्हटलं.
नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?
“त्यांना कोणी नाही म्हटलंय?”
“माझा विषय काही चित्रपट नाहीय. माझा विषय आहे की, जे सत्य आहे ते देशाच्या हितासाठी समोर आणलं पाहिजे. त्या सत्याचे अनेक पैलू असू शकतात. एखाद्याला एखादी गोष्ट दिसते तर एखाद्या दुसरी गोष्ट दिसते. ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी आपला दुसरा चित्रपट बनवावा. त्यांना कोणी नाही म्हटलंय?,” असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केलाय. यानंतर उपस्थित खासदारांनी टाळ्या वाजवून मोदींच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला.
“विरोध करणारे हैराण झालेत…”
“मात्र ते (चित्रपटाला विरोध करणारे) हैराण झालेत की जे सत्य एवढ्या वर्ष दाबून ठेवलं ते तथ्यांच्या आधारे बाहेर आणलं गेलं, कोणीतरी मेहनत करुन ते बाहेर आणलं जात आहे तर ते थांबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत,” असंही मोदींनी खासदारांशी संवाद साधताना म्हटलंय.
असे चित्रपट बनायला हवेत…
पंतप्रधानांनी हा चित्रपट फार उत्तम असल्याचं सांगितलं. तसेच अशाप्रकारचे आणखी चित्रपट निर्माण केले पाहिजेत अशी इच्छाही पंतप्रधानांनी बोलून दाखवली. “द कश्मीर फाइल्स हा फार चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहिला पाहिजे. असे चित्रपट आणखी बनले पाहिजेत. अशा चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे,” असं पंतप्रधानांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं.
मोदींची भेट
१२ मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळीही मोदींची चित्रपटाचं कौतुक केलं होतं आणि चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.