दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर बराच गाजतोय. प्रेक्षक आणि समीक्षकांनीही या चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर काही सेलिब्रेटींनीही या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचं कौतुक केलं आहे. मात्र बॉलिवूडच्या मोठ्या आणि प्रसिद्ध कलाकारांनी यावर अद्याप मौन साधलं आहे. यावर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत यावर बोलताना विवेक अग्नीहोत्री म्हणाले, ‘हे गरजेचं नाही. आता देश बदलत आहे आणि पूर्वी बनवण्यात आलेले नियम आता मागे पडताना दिसतायत. या चित्रपटात पल्लवी जोशी यांचा एक डायलॉग आहे, ‘हुकूमत कोणाचीही असो, सिस्टिम तर आमचीच आहे ना.’ पण या गोष्टी आता बदलताना दिसत आहेत. सत्य सर्वांसमोर येत आहे. काश्मीर फाइल्स हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. ही कथा बॉलिवूडची नाहीये तर काश्मीर मधील लोकांच्या संघर्षाची आहे.’
आणखी वाचा- “हीच ती वेळ…”, ‘द कश्मीर फाइल्स’ वर रितेश देशमुखचे ‘ते’ ट्विट चर्चेत
याशिवाय या चित्रपटाबाबत बॉलिवूडमधील कलाकारांनी मौन साधण्यावर पुष्कर नाथ पंडित यांची भूमिका साकारणारे अभिनेता अनुपम खेर म्हणतात, ‘ही कथा बॉलिवूडकरांची नाहीये तर ही एक सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे लोकांनी प्रतिक्रिया दिल्याने किंवा न दिल्याने काहीच फरक पडत नाही.’
दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.