काश्मिरी पंडितांच्या समस्येवर आधारित चित्रपट द कश्मीर फाईल्स सध्या प्रचंड गाजत आहे. या चित्रपटावरून देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. या चित्रपटात १९९० च्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची कथा दाखवण्यात आली आहे. आता याच धर्तीवर ‘द केरळ स्टोरी’ असाही एक चित्रपट येणार आहे. निर्माते विपुल शाह यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.
विपुल शाह यांनी सांगितलं की ते सत्य कथेवर आधारित हा द केरळ स्टोरी चित्रपट बनवत आहेत. त्यांचा हा चित्रपट बेपत्ता झालेल्या ३२ मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत. या चित्रपटाचा छोटा टीझरही प्रदर्शित झाला आहे.
या टीझरमध्ये सुरुवातीला एक घड्याळ दाखवलं गेलं आहे. हे घड्याळ ११.५६ वाजता सुरू होऊन १२.०१ वाजता थांबतं. घड्याळ थांबल्यावर एक ओळ स्क्रीनवर दिसते की, जर तुमची मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी पोचली नाही तर तुम्हाला कसं वाटेल? केरळमध्ये हजारो मुली गायब झाल्या आहेत आणि गेल्या १२ वर्षांमध्ये त्या आपल्या घरी कधीच परतल्या नाहीत. यासोबतच बॅकग्राऊंडला अनेकांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत आहे.
व्हिडिओमध्ये पुढे लिहिले आहे की, गेल्या १० वर्षांपासून हजारो मुलींची ISIS आणि इतर इस्लामिक युद्धक्षेत्रांमध्ये तस्करी करण्यात आली आहे. चित्रपटाच्या नावानंतर व्हिडिओच्या शेवटी लिहिले आहे की, ही कथा ३२ हजार मुलींची सत्यकथा आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’नंतर आता अनेक निर्माते आपल्या चित्रपटातून सत्य लोकांसमोर आणण्याचे धाडस दाखवू लागले आहेत, असे लोक म्हणत आहेत.