‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या चित्रपटामुळे चर्चेला आणि वादाला नवा विषय मिळाला असून केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले, या सत्यघटनेवर हा चित्रपट आधारित आहे. ‘द केरळ स्टोरी’या चित्रपटाविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदच्या वकिलांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र जमियतच्या सीबीएफसी प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
हेही वाचा : ‘The Kerala Story’ला ‘The Kashmir Files’प्रमाणे डोक्यावर घेणाऱ्यांना ‘हे’ सत्य माहीत आहे का?
केरळ उच्च न्यायालय या प्रकरणाची तातडीने सुनावणी करीत नसल्याचा दावा जमियतच्या वकिलांनी केला आहे. कित्येकांनी या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या, तसेच सीबीएफसीने या चित्रपटाला प्रदर्शित करण्याचे प्रमाणपत्र कसे दिले, असाही प्रश्न एका याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेमध्ये केला आहे. हा चित्रपट शुक्रवार, ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जमियत उलेमा-ए-हिंदच्या वकिलांनी केली असता, यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, “तुम्ही वारंवार चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करीत आहात, परंतु निर्मात्यासह चित्रपटाशी संबंधित अनेक लोकांनी यासाठी मेहनत घेतली आहे. त्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकांना ठरवू द्या, चित्रपट चांगला आहे की वाईट?”, सीबीएफसीने या चित्रपटाला प्रदर्शित करण्याचे प्रमाणपत्र दिल्याने सीबीएफसीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत याचिका फेटाळून लावली आहे.
हेही वाचा : ‘दंगल’फेम अभिनेत्रीचा मुंबईतील आलिशान फ्लॅटमध्ये गृहप्रवेश!
हेही वाचा : ‘मैं अटल हूं’ पंकज त्रिपाठींनी साकारला हुबेहूब लुक! व्हिडीओ शेअर करत सांगितले अटलजींचे विचार
दरम्यान, केरळमध्ये लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या चित्रपटामुळे मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम् या भाषांमध्ये ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.