अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा बहुचर्चित ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट सध्या सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. लवकरच हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या ३० डिसेंबरला हा चित्रपट भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ‘महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही’, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले आहेत.
अभिनेता फवाद खानचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या ३० डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे. याप्रकरणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी दोन ट्वीट करत थेट इशारा दिला आहे. “पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही”, असे अमेय खोपकरांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : “आम्ही सीबीआयला…” सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याच्या दाव्यानंतर शेखर सुमन यांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
त्याबरोबर अमेय खोपकरांनी चित्रपटगृहांच्या मालकांना इशाराही दिला आहे. “थिएटरमालकांना नम्र आवाहन मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका”, असे त्यांनी यात म्हटले आहे.
अभिनेता फवाद खानचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट १३ ऑक्टोबरला पाकिस्तानसह जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाकिस्तानातून चांगलीच पसंती मिळाली. विशेष म्हणजे जगभरातील अनेक प्रेक्षकांनी याचे कौतुक केले. ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ हा पाकिस्तानी चित्रपट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे.
हा चित्रपट ‘मौला जट्ट’ या चित्रपटाचा रिमेक आहे. यात फवाद खान आणि माहिरा खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने अनेक भारतीय चित्रपटांचे रेकॉर्ड मोडल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केल्याचेही बोललं जात आहे. अनेक भारतीय प्रेक्षकांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित करावा, अशी विनंती केली होती.