रेश्मा राईकवार

जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नसतं ही नकळत्या वयापासून आपल्या मनावर बिंबवलेली गोष्ट. कोणत्याही कारणाने जगण्याची इच्छा उरली नाही म्हणून मरण कवटाळायचा अधिकार आपल्याला कायदा देत नाही. आणि आत्महत्या म्हणजे शास्त्रात म्हटल्याप्रमाणे गुन्हाच ठरतो. म्हणून ज्या सन्मानाने मी आयुष्य जगलो, त्याच सन्मानाने मला मृत्यूची वाट निवडू द्या.. असं म्हणत कायद्यापासून ते राष्ट्रपतींपर्यंत सगळी दारे ठोठावणाऱ्या नारायण आणि इरावती लवाटे या दाम्पत्याने देश हलवून सोडला होता. जगायचं नाही आहे म्हणून नव्हे तर पुरेपूर जगून झालं आहे, आता निघायची वेळ झाली आहे म्हणत त्यासाठी लढणाऱ्यांचा त्यामागचा विचार आणि त्या अनुषंगाने खरोखरच मृत्यूचं अधिकारस्वातंत्र्य देण्याची गरज आहे का? या विषयाची तार्किक मांडणी ‘आता वेळ झाली’ या चित्रपटात पाहायला मिळते.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
pune Mobile filming was done in washroom of girls school
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा

इच्छामरण या विषयाचे अनेक पैलू कायद्याच्या चौकटीतूनही तपासले गेले आहेत. २०१८ मध्ये आपल्याकडे काही अटी-शर्तीवर अंथरुणाला खिळलेल्या व मरणासन्न व्यक्तीला इच्छामरणाचा अधिकार कायद्याने दिला गेला. मात्र निरोगी प्रकृती असलेल्या आणि तरीही आयुष्य जगण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तींना अजूनही इच्छामरण स्वीकारण्याचा अधिकार नाही. त्या पार्श्वभूमीवर नारायण आणि इरावती लवाटे या वृद्ध दाम्पत्याने सन्मानाने मृत्यू मिळावा यासाठी दिलेल्या लढय़ाची गोष्ट मुळातून समजून घ्यावी अशी आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने या दोघांचे त्यामागचे विचार समजून घेत ‘आता वेळ झाली’ या चित्रपटातून इच्छामरण विषयाचे विविध पैलू उलगडले आहेत. इथे शशीधर लेले आणि रंजना लेले या काल्पनिक जोडप्याच्या माध्यमातून ही कथा रंगवली गेली आहे.

हेही वाचा >>>सोनाली कुलकर्णीचा नवरा करतो ‘हे’ काम, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

देशभरात आज मुले सोडून गेली म्हणून.. मुलांनी दुर्लक्ष केले म्हणून.. कोणीच वारस नाही म्हणून अशा विविध कारणांनी एकाकी पडलेली अनेक वृद्ध जोडपीही आहेत आणि एकटेच आयुष्य काढणारे वृद्धही आहेत. कोणाला आजारपणामुळे आयुष्य नकोसं झालं आहे, कोणाला एकटेपणाने आयुष्य काढायचं नाही आहे, कोणाची आर्थिक क्षमता कमकुवत आहे.. अशी हजारो कारणं आहेत. ‘आता वेळ झाली’ या चित्रपटातील लेले दाम्पत्य मात्र कुठल्याही असाहाय्यतेतून आलेल्या भावनेपेक्षा अधिक विचारपूर्वक सन्मानाने मृत्यूचा अधिकार मागताना दिसते. या दोघांनीही सुरुवातीपासून काही एक विचाराने आयुष्याचं नियोजन केलं आहे. शशीधर लेले हे राज्य परिवहन मंडळात अधिकारी पदावरून निवृत्त झाले. तर रंजना लेले या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका. या दोघांनाही मूल नको होतं, त्यांनी ठरवून तो निर्णय घेतला होता. मुंबईतील चाळीत राहणाऱ्या या दाम्पत्याने एकमेकांच्या घट्ट साथीने आजवरचं आयुष्य सुखासमाधानात व्यतीत केलं आहे. आता दोघांपैकी एकाचं आधी निधन झालं तर मागे राहणाऱ्या दुसऱ्याकडे कोण बघणार? एकमेकांबरोबर जगलो आता एकत्र मरू हे त्यांच्या आजवरच्या बळकट सहजीवनातलं पुढचं पाऊल आहे. एकत्रित मृत्यूचा निर्णयही त्यांनी सहमतीने घेतला आहे, त्यात त्यांना ना कुठलंही भय वाटतं आहे ना दोघांपैकी कुणाचं पाऊल अडखळतं आहे. अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा एकत्र सायनाईड घेऊन मरणं त्यांना अधिक योग्य वाटतं, पण त्यांच्या या इच्छेला कायदा मंजुरी देत नाही. त्यासाठी दोघं राष्ट्रपतींकडे दाद मागतात. न्यायालयात जातात. ज्या देशात इच्छामरण कायदेशीर आहे तिथून काही मदत मिळते का? याचीही चाचपणी करतात, मात्र कुठूनही त्यांना मार्ग मिळत नाही. तेव्हा या दोघांच्या मनात उमटणारी आंदोलनं आणि त्यांनी त्यांच्या परीने शोधलेलं उत्तर म्हणजे ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट.

हेही वाचा >>>शुभमंगल सावधान! अखेर प्रथमेश परब-क्षितीजा घोसाळकर अडकले लग्नबंधनात, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…

कुठल्याही पद्धतीने एकाकी वा एकटं पडल्याची भावना मनात नसताना, प्रकृती धडधाकट असताना आपला मृत्यूचा वेळ आणि मार्ग निवडण्याचा अधिकार मागणाऱ्या व्यक्तीचं मन उलगडून दाखवत ही गोष्ट रंगवण्याची दिग्दर्शकाची शैली या चित्रपटासाठी महत्त्वाची ठरली आहे. शशीधर आणि रंजना यांच्या नात्यातील गंमत, त्यांचं रोजचं जगणं, सकाळी उठण्यापासून या दोघांमध्ये सुरू होणारे संवाद, नाश्त्याच्या टेबलवर रंगणारी आपल्या मागणीविषयीची चर्चा, कधी चित्रपट पाहणं, कधी भाजी खरेदी, कधी हॉटेलमध्ये जेवता जेवता पाहिलेल्या चित्रपटावरून मनात जागलेल्या गत आयुष्याच्या आठवणी, कधी आपल्याच निर्णयांची होणारी उजळणी, कोण चुकलं आणि कोण बरोबर याची उलटतपासणी न करता एकमेकांवरच्या विश्वासाने जो निर्णय घेतला आहे त्यानुसार पुढे जाण्यासाठीची धडपड अशा खूप छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतून त्यांच्या नात्यातील गंमत उलगडत हा गंभीर वाटणारा विषय लेखक – दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी खुलवला आहे. तशी या चित्रपटातील मूळ विषयाची चर्चा थोडी शब्दबंबाळ काहीशी कंटाळा आणणारी आहे. पण त्याला अत्यंत नैसर्गिक, वास्तविक पद्धतीच्या चित्रणाची जोड आणि दिलीप प्रभावळकर – रोहिणी हट्टंगडी या दोन कसलेल्या कलाकारांची लाभलेली साथ यामुळे हा चित्रपट रटाळ होत नाही. वा भावनिक नाटय़ाचा अतिमाराही त्यात नाही. चाळीच्या छोटय़ाशा चौकोनी अवकाशात आणि एकाच जागेतही या दोघांचे संवाद, सहज अभिनय, त्यांच्यातील देवाणघेवाण यामुळे नेहमीचे वाटणारे प्रसंगही आपल्याला मनापासून भावतात. आपल्याच घरात किंबहुना आपल्याचबरोबर घडतो आहे अशा सहजशैलीतील चित्रण, खिडकीतून दिसणाऱ्या इमारतींच्या गर्दीतून न दिसणारं आभाळ, शशीधर यांचा वरवर विक्षिप्त वाटणारा स्वभाव आणि रंजना यांची सगळं हसतखेळत स्वीकारण्याची निखळ वृत्ती अशा कथेत संदर्भ असलेल्या बारीकसारीक गोष्टीही कॅमेऱ्याने अचूक टिपल्या आहेत. त्यामुळे संवाद, अभिनयातून खुलत जाणारा हा चित्रपट या दृश्यचौकटीतूनही अधिक बोलका झाला आहे. दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या अभिनयामुळे त्यातील विषयापेक्षा त्यातून मिळणारा अप्रतिम भावानुभव अधिक लक्षात राहतो. 

आता वेळ झाली

दिग्दर्शक  – अनंत महादेवन

कलाकार – दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोळकर, गुरू ठाकूर, भाग्यश्री लिमये, जयवंत वाडकर.

Story img Loader