प्रख्यात रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की सर्वपरिचित आहेत ते त्यांच्या ‘आई’ या कादंबरीमुळे. त्यांचं अवघं लेखन माणूस, त्याचं जगणं, त्या जगण्यातलं सत्त्व आणि स्वत्व याभोवती फिरताना दिसतं. १९०२ साली त्यांनी लिहिलेलं ‘द लोअर डेप्थस्’ हे नाटक वास्तवदर्शी सामाजिक नाटकाचा अस्सल वानवळा म्हणता येईल. म्हणूनच या नाटकावर विख्यात जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांना दोनदा चित्रपट बनवावासा वाटला. चिनी, फ्रेंच, रशियन, फिनिश भाषेतही त्यावर चित्रपट निघाले. आपल्याकडे दिग्दर्शक चेतन आनंद यांनी ‘नीचा नगर’ (१९४६) हा सिनेमा त्यावर बनवला. आज शतकोत्तर एक दशक लोटूनही हे नाटक समकालीन वाटतं, जगभरच्या रंगकर्मीना ते पुन:पुन्हा करावंसं वाटतं, याचं कारण त्याचं सार्वकालिकत्व! यातली पात्रं, त्यांची उच्चारायला व लक्षात राहायलाही अवघड अशी रशियन नावं, विशिष्ट प्रादेशिकता आणि अपरिचित संस्कृती यामुळे सुरुवातीला काहीसं बाचकायला होत असलं तरी जसजसं नाटक पुढं सरकतं, तसतसं त्यातल्या पात्रांच्या जगण्याशी आपण संवादी होत जातो आणि त्यांचं अधोविश्व आपल्याला सहअनुभूत होतं. मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं ‘द लोअर डेप्थस्’ पाहण्याचा नुकताच योग आला. अनिरुद्ध खुटवड या अभ्यासू दिग्दर्शकानं ते बसवलं होतं.
या नाटकाला कथानक नाही. आहेत ती भिन्न भिन्न प्रकृती व प्रवृत्तीची अभावग्रस्त, वंचित, शोषित, उपेक्षित पात्रं! त्यांना एकत्र आणणारा क्षीण धागा आहे तो त्यांचं आत्मविश्वासहीन, कापल्या गेलेल्या पतंगासारखं भरकटलेलं आयुष्य! ही मंडळी एका छताखाली वास्तव्याला असली तरी त्यांच्यात कसलेही बंध नाहीत. किंबहुना, परस्परांना ओरबाडतानाच ते जास्त दिसतात. त्या प्रत्येकाला आपला असा एक भूतकाळ आहे. वैफल्यग्रस्त. कुरतडणारा. आत्मविश्वास खचवणारा. या माणसांत कुणी चोर आहे. जुगारी आहे. दारूडय़ा आहे. गुंड आहे. वेश्यावृत्तीची स्त्री आहे. अपयशी कलावंत आहे. समाजात ज्यांना अध:पतित म्हणवले जाते, ते सर्व इथं डॉर्मिटरीवजा जागेत आश्रयाला आले आहेत. पण कुणालाच कुणाविषयी सहानुभूती नाही की आपुलकी. त्या जागेचा मालक बरोन हा एक निष्ठुर, पाताळयंत्री गृहस्थ आहे. त्याची बायको वाश्न्या हीसुद्धा स्वकेंद्री, आपमतलबी स्त्री आहे. आपल्या सख्ख्या बहिणीचा- नताशाचाही ती असह्य़ शारीरिक-मानसिक छळ करते. कारण काय? तर ती ज्याच्यावर फिदा आहे तो वास्का नताशाच्या मागे लागलाय. वाश्न्याला नवऱ्यापासून सुटका हवीय. डॉर्मिटरीतील चोर वास्काशी तिचे छुपे संबंध आहेत खरे; परंतु नाइलाजापोटीच तो तिच्याशी संबंध ठेवून आहे. त्याला तिच्याबद्दल काडीमात्र प्रेम नाहीए. तिला मात्र त्याच्याशी लग्न करायचंय. परंतु तत्पूर्वी त्यानं बरोनचा काटा काढावा अशी तिची इच्छा आहे. मात्र, वास्का तिला पुरता ओळखून आहे. नवऱ्यापासून सुटका झाली की ही बाई आपल्यालाही दूर लोटायला मागेपुढे पाहणार नाही, हे त्याला चांगलंच माहीत आहे. त्याचा जीव जडलाय तो नताशावर. पण ती त्याला भीक घालत नाही. कारण? त्याचे वाश्न्याबरोबरचे अनैतिक संबंध! तिचा कुणावरही विश्वास नाही. अगदी स्वत:वरही. संपूर्ण आत्मविश्वास गमावलेली नताशा दैवाला दोष देत, कुढत बहिणाच्या आश्रयानं जगतेय. तिथली इतर माणसंही आयुष्यात सर्वस्व हरवलेली, किडय़ा-मुंगीवत जगणारीच आहेत. त्यांच्या जगण्याला कसलीही दिशा नाही. हेतू नाही. आला दिवस ढकलणं, यापलीकडे त्यांच्या आयुष्यात काहीच घडत नाही.
तथापि एके दिवशी लुका नावाचा एक मुसाफीर डॉर्मिटरीच्या आश्रयाला येतो आणि अधोविश्वातल्या या माणसांचं थबकलेलं, साकळलेलं जीवन हळूहळू डहुळं लागतं. नताशाला सोबत घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात का करत नाहीस, असं तो वास्काला विचारतो. नताशालाही नैराश्येच्या अंधाऱ्या खाईतून बाहेर काढून आयुष्याकडे नव्या आशेनं पाहण्यास भाग पाडतो. व्यसनी कलावंताला त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी हात देतो. तर वाट चुकलेल्या वा हरवलेल्या इतरांच्याही जीवनात आशेचे नवे किरण त्यांना दाखवू पाहतो. सुरुवातीला सगळेच जण त्याला खोटी आशा दाखवणारा म्हणून हडतूड करतात. परंतु न रागावता तो आपलं काम करत राहतो. त्यांना समजावू पाहतो. एक ना एक दिवस जगण्याचं प्रयोजन विसरलेली ही माणसं आपल्याभोवती उभारलेल्या नकारात्मक कोशातून बाहेर येतील याची त्याला खात्री वाटते.
तशी लक्षणं दिसतातही. परंतु..
बोल्शेविक क्रांतीपूर्वीच्या रशियातील अधोविश्वाचं चित्रण करणारं हे नाटक. अनेक पात्रांची गर्दी, त्यांचं वर्तमान जगणं तसंच त्यांचा भूतकाळ, त्यातून साऱ्या जगाप्रती त्यांना वाटणारी बेफिकीरी, तिरस्कार.. अगदी स्वत:बद्दलही(!), कमालीचं निराश, वैफल्यग्रस्त करणारं भोवतालचं वातावरण.. सारं काही संपल्याची त्या सर्वाना पटलेली खात्री.. अशा माहोलमध्ये हे नाटक घडतं. संथ, ठाय लयीतलं एखादं धीरगंभीर गाणं अनुभवावं तसं हे नाटक प्रेक्षकाचा ठाव घेतं. प्रारंभी बुचकळ्यात पाडणारी पात्रांची गर्दी पुढं एकेकजण जसा आपल्याला उलगडत जातो, तसतशी संभ्रमातून बाहेर काढते. समाजाकडून नाकारले गेलेले, अन्यायित झालेले, अभावग्रस्त लोक गुन्हेगारी व व्यसनाधीनतेकडे वळतात. त्यांचं समाजविघातक वर्तन व कारवायांचा उपद्रव होतो म्हणून पुन्हा हाच समाज त्यांना कारावास वा बहिष्कृततेची शिक्षा फर्मावतो. परंतु खरं तर जी ‘घाण’ आपणच निर्माण केलीय, ती स्वच्छ करण्याची जबाबदारीही समाजाचीच.. नाही का? हा सवाल हे नाटक उपस्थित करतं. नाटकाचा शेवट वरकरणी नकारात्मक वाटत असला तरी उद्याची पहाट आशादायी असणार आहे याचं सूचन करणारा आहे. दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड यांनी सबंध प्रयोग एका अलवार, ठाय लयीत, तरीही प्रवाहीरीत्या बसवला आहे. यातल्या पात्रांच्या क्लिष्ट रशियन नावांच्या जंजाळातून आपल्याला लीलया बाहेर काढत नाटकाशी, त्यातल्या अंगावर काटा आणणाऱ्या वास्तवाशी एकरूप करण्याची किमया त्यांना साधली आहे. नाटकात पात्रांच्या भाऊगर्दीतही त्यांनी प्रत्येकाला आपली अशी विशिष्ट ‘ओळख’ दिली आहे. वातावरणनिर्मिती, प्रदेशविशिष्टता, पात्रांची संस्कृती, त्यांची काळोखी मानसिकता, दिशाहीन आयुष्यं.. आदी अस्सलता त्यांनी प्रयोगात उतरविली आहे. पात्रांचं व्यक्त होणं, त्यांचे पेहेराव, नेपथ्य, नृत्यशैली असे बारीकसारीक तपशील त्यांनी जिवंत केले आहेत. प्रयोग मूळ संहितेशी इमान राखेल हे त्यांनी कसोशीनं पाहिलं आहे. नाटकात अभिप्रेत अंतर्गत आशयसूत्र ठाशीवपणे प्रयोगात आणलं आहे. संतोष जाधव (नेपथ्य), स्नेहा (वेशभूषा), उल्हेश खंदारे (रंगभूषा), प्रसाद वाघमारे, संजय कुमार व पुष्कर सरद (प्रकाशयोजना) यांचं या वास्तवदर्शी प्रयोगात तितकंच महत्त्वपूर्ण योगदान आहे.
धम्मरक्षित रणदिवे (लुका), अमृता तोडरमल (नताशा), नमिता चव्हाण (वाश्न्या), प्रमथ पंडित (अ‍ॅक्टर), विशाल (वास्का), शलाका गाडे (अ‍ॅना), क्षमा वासे (वासिला), प्रीती दुबे (नास्त्या), अंकुर वाढवे (आल्योश्का) यांच्यासह सगळ्या कलाकारांनी समरसून कामं केली आहेत. प्रयोग विश्वासार्ह करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा