माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक आणि पोलिस यांच्यातील तणावपूर्ण संबंध आणि त्याला रहस्यपूर्ण कथेची दिलेली जोड असा आगळावेगळा कथाविषय आणि धाटणी असलेला ‘घात’ हा चित्रपट २७ सप्टेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये छत्रपाल निनावे दिग्दर्शित आणि अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘घात’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार पडला. आता हा चित्रपट मायदेशात प्रदर्शित होणार आहे.
शिलादित्य बोरा यांची ‘प्लॅटून वन’, मनीष मुंद्रा यांची ‘दृश्यम फिल्म्स’ आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘घात’ सिनेमातील कलाकारांची फौजही अगदी तगडी आहे. मराठीतील अत्यंत संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम यांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा >>>भाऊचा धक्का नव्हे तर…; या आठवड्यात रितेश देशमुख घेणार नाही सदस्यांची शाळा, काय आहे कारण?
या चित्रपटाचे छायाचित्रण उदित खुराणा यांचे आहे. उदित खुराणा यांनी याआधी नेटफ्लिक्सवर ‘द हंट फॉर वीरप्पन’ हा माहितीपट आणि हुमा कुरेशी अभिनीत ‘बयान’ अशा दोन कलाकृतींवर काम केलं आहे.
‘घात हा एक खोल आशय असलेला चित्रपट आहे. विश्वास आणि कुणीतरी दगा दिल्यावर होणारा विश्वासघात दोन्हीचं चित्रण करणारा ‘घात’महाराष्ट्रातील अशा दुर्गम भागात घडतो जिथे कायद्याचं राज्य तर आहे, पण अंमल नाही. जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी भयप्रद, काहीतरी धोकादायक दडलेलं असू शकतं, तशी भीती असते. तरीही तिथे जीवनाचा एक प्रवाह चाललेला आहे. तिथल्या आयुष्यातली नैतिक-अनैतिकता निराळी आहे. त्यांच्या दुविधा निराळ्या आहेत, त्यातून आकार घेणारं जगणं निराळं आहे. त्यामुळेच अनेक भावभावनांचं मिश्रण असलेली ही कथा भारतीय प्रेक्षकांसमोर आणताना मी विशेष उत्सुक आहे. या सिनेमाद्वारे एका निराळ्या वास्तवाचा अनुभव घेण्यासाठी मी प्रेक्षकांना आमंत्रित करतो आहे’ अशी भावना दिग्दर्शक छत्रपाल यांनी व्यक्त केली.