सुषमा देशपांडे
सतीश आळेकर लिखित ‘ठकीशी संवाद’ हे नाटक नुकतेच पाहिले. २२ वर्षांनंतर आळेकरांचे नाटक आले आहे. करोना असताना टाळेबंदीच्या काळात लिहिलेले हे नाटक अर्थात २०२० सालात लिहिलेले हे नाटक २०२४ मध्ये रंगमंचावर आले आहे. दरम्यान, या नाटकाचे वाचनाचे कार्यक्रम आळेकरांनी केले होते. त्याची खूप प्रशंसा मी ऐकली होती. मात्र प्रयोग पाहणे हा वेगळा आनंद असतो. किंचित गालातल्या गालात किंवा मोकळेपणाने हसत स्वत:मध्ये खोलवर डोकावून पाहायला लावणारे हे नाटक आहे.
सतीश आळेकर त्यांच्या नाटकातून मध्यमवर्गीय सामान्य जगण्यावर भाष्य करतात. जगण्याकडे तिरकस नजरेने पाहण्याची जबरदस्त ताकद त्यांच्याकडे आहे. अर्थात ‘ब्लॅक ह्युमर’ हे या नाटकाचे अंग आहे. मराठी रंगभूमीवर ‘ब्लॅक ह्युमर’ नाटकांची परंपरा निर्माण करणारा हा लेखक आहे. आळेकरांची ‘महानिर्वाण’, ‘महापूर’ ही नाटके आठवा. (मी त्या नाटकांवर लिहिण्याचा मोह टाळणार आहे, कारण आजचा विषय तो नाही) आळेकरांचे त्याच ताकदीचे हे नाटक आहे. ती नाटके तरुण वयात लिहिली होती आणि हे नाटक त्यांच्या सत्तरीच्या दशकातले आहे, पण आजही ‘ब्लॅक ह्युमर’ वापरण्याची धार कमी नाही झालेली. किंबहुना जास्त धारदार झाली आहे.
नाटकात ७५ वर्षांचा एक अविवाहित इसम करोनाकाळात टाळेबंदीमुळे घरात बंद आहे. एकटेपणा अशा अवस्थेत नको होतो. या परिस्थितीत या इसमाने, ‘ठकीशी’ केलेला हा संवाद आहे. हा एक खेळ आहे, ज्यातून सामान्य माणसाचं जगणं समोर येतं. ही ठकी कोण आहे? आळेकर जणू ‘ठकीचा शोध तुमचा तुम्ही घ्या’ म्हणतात. नाटकात ठकी आहे आणि म्हणून संवादाचा खेळ खेळला जातो आहे. आळेकर जन्मापासून मृत्यूपर्यंत, साधारण- सामान्य जगण्यावर भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय चिमटे काढत राहतात. थपडा देत राहतात. नाटकातील ही गोष्ट म्हणाल तर साधी सरळ, मात्र स्वत:मध्ये डोकावायला लावणारी आहे.
आळेकर ज्या पद्धतीची विशेषणे वापरतात, भाषा वापरतात त्याने सहजपणे नाटकातील मध्यमवर्गीय मानसिकता नागडी होते. तुम्हाला हसवत, तुमच्या अवतीभोवती विळखा घालते. नाटक पाहताना आपण हसतो, नंतरही नाटकातील प्रसंग, संवाद आठवून अवाक होतो. मी नाटक पाहण्याचा रसभंग करू इच्छित नाही म्हणून मी नाटकाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार नाही, ती तुम्हीच तुमची पाहायला हवी, कारण ती तुमची, माझी, आपणा सर्वांची गोष्ट आहे. असे नाटक दिग्दर्शित करणे हे खरेच मोठे आव्हान असते. अनुपम बर्वे या दिग्दर्शकाने ते उत्तम पेलले आहे. अनुपमचे ‘ब्लॅक ह्युमर’च असलेले ‘उच्छाद’ नाटक मी पाहिले होते. खूपच चांगले केले होते त्याने. तरीही आळेकरांचे लेखन पेलणे ही अवघड बाब आहे.
लेखन म्हणून सोपे सरळ वाटणारे आणि तिरकस भाष्य करत राहणारे प्रसंग नेमके पकडणे सोपे नाही. त्याच्यातल्या अर्थछटा समजून घेऊन नेमकेपणाने ते पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. दिग्दर्शक आळेकरांचे लेखन उगाच जास्त धारदार (शार्प) करत नाही किंवा पातळ, सपकही करत नाही. नेमक्या पोतासह तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुम्हाला खिळवून ठेवतो. आपण प्रेक्षागृहात शिरतो आणि अनेक amazon चे बॉक्स रंगमंचाचा जवळजवळ ३/४ भाग व्यापून टाकलेले दिसतात. पंचाहत्तरीतल्या माणसांच्या घरातले जमलेले पोकळ सामान म्हणा किंवा करोनाकाळात येणारी/ आलेली पार्सल म्हणा. हा इसम त्या अडगळीचा भाग म्हणा, सर्वत्र हे बॉक्स आहेत. त्यातून फिरता येईल, हे लक्षात येते आणि तसा उपयोग दिग्दर्शकाने केला आहे. त्याच बॉक्सच्या गर्दीत नंतर दिसणाऱ्या चित्रफिती दाखवण्याची सोय असलेला पडदा आहे. त्याची जागा चांगली निर्माण केली आहे. पूर्वा पंडितने तिचे काम, म्हणजे नेपथ्य चोख केले आहे. (नाटकात वापरली जाणारी सामग्री त्या बॉक्समध्ये ठेवायला चांगली जागा निर्माण केली आहे. रंगमंचावरील एक व्हिलचेअर आणि एक शिवणाचे मशीन जणू हे, या इसमाचे घर असल्याची ओळख निर्माण करते.
लेखकास अपेक्षित असलेला काळ चित्रफितीतून चांगल्या पद्धतीने निर्माण होतोच. तसेच आत्ताच्या निर्माण केलेल्या चित्रफितीही अपेक्षित काळाशी सुसंगत झाल्या आहेत. खूपच मजा येते या चित्रफितीतून. विक्रांत ठकारने अशा नेपथ्यात केलेली प्रकाशयोजना योग्य परिणाम साधते. आता वळू या अभिनेत्यांकडे. पंचाहत्तरीतला इसम आहे सुव्रत जोशी आणि ठकी आहे गिरिजा ओक. ठसकेबाज ठकी गिरिजा सहजतेने, नेमकी सादर करते. तसे ठकी हे संवाद होण्यासाठी आणि गोष्ट पुढे नेण्यासाठी वापरलेले पात्र. ज्या पात्राला भूतकाळ नाही, या पात्राचे तसे या इसमाशी नाते नाही आणि आहेही. ठकी या आपल्या मालकाला ‘धनी’ म्हणते. हे ‘धनी’ म्हणण्यापासून गिरिजा गंमत आणते. कथा सांगताना अनेक पात्रे चपखलपणे, सहजतेने गुंफत जाते. जसे शाळेतील हजेरी चालू होते, हजर असण्याचा होकार ठकी विविध प्रकारे देते, छोटुसा मात्र मजा येते या प्रसंगात. हे फक्त उदाहरणादाखल सांगते आहे. काही जागांवर उत्तम गाते. प्रेक्षकांशी सहज संवाद साधते. प्रथम साडीत रंगमंचावर येणारी ठकी नंतर खोक्यांच्या मध्ये शिरत कपडे बदलते. तिची वेशभूषा चांगली झाली आहे. आजच्या काळातल्या ठकीचा ड्रेस एकदम बरोबर आहे, असे वाटून जाते. गिरिजा आपल्या मनात ठकीची जागा निर्माण करते, मात्र ठकीचेच राज्य नाही निर्माण करत, हे महत्त्वाचे आहे. नाही तर ठकीच आपल्या मनात वसली असती आणि नाटकाचा तोल बिघडला असता.
तिचा धनी आपल्याला भेटतो. धन्याशी आपण जोडले जातो. धन्याची, या इसमाची भूमिका करणारा सुव्रत जोशीही उत्तम काम करतो. त्या इसमाच्या छटा, लेखकाचे म्हणणे आपल्यापर्यंत पोहोचवतो. मात्र, सुव्रतवर दिग्दर्शकाने अन्याय केला आहे, असे मला वाटले. त्याची या पात्रासाठीची निवडच चुकीची वाटते. केस पांढरे करून, मेकअप करून तो पंचाहत्तरीतला वाटत नाही. आशीष देशपांडेने रंगभूषेचा चांगला प्रयत्न केला आहे. तरीही गिरिजाहून वयाने मोठ्या असलेल्या कलाकाराची निवड का नाही केली? हा प्रश्न पडतो. एकदा आपण सुव्रतला म्हातारे म्हणून स्वीकारले (जे आपण स्वीकारतो) की नाटक आपले होते, मात्र वयाने मोठा कलाकार असता तर नाटकातली गंमत अजून वाढली असती.
राखाडी स्टुडिओने हे नाटक निर्माण केले आहे. नाटकाचे निर्माते आहेत अमेय गोसावी आणि गंधार संगोराम ( Be Birbal, Company). वेगळ्या धाटणीची नाटके करण्यासाठी अमेय गोसावी नेहमीच उभा राहतो, त्याचे कौतुकच आहे. या नाटकासाठी गंधारसारखा जाहिरात कंपनी चालवणारा तरुणही निर्माता म्हणून पुढे आला आहे. कोणत्याही नाटकाची निर्मिती करताना हे नाटक आर्थिक पातळीवर यश मिळवेल का? याचा अंदाज करता येत नाही. अगदी सतीश आळेकर नावास लेखक म्हणून कितीही मान्यता असली तरी हे सांगता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर या तरुणांनी निर्माता म्हणून नाटकामागे उभे राहणे खूपच समाधान देणारे आहे. नाटकानंतर मानवंदना करण्यास रंगमंचावर अवतरलेली नाटकामागे उभी राहिलेली तरुणाईही खूप कौतुकास पात्र आहे. नाटकातले अनेक संदर्भ हे सतीश यांच्या पिढीतल्या लोकांना जास्त जाणवतील. जास्त भिडतील. मात्र म्हणून तरुण वर्गाला नाटक परके वाटेल, असे नाही. एखादा संदर्भ नाही समजला, तर समजून घेता येतोच. सतीश आळेकर या मातीतला लेखक आहे. ज्या मातीत आजचा तरुण वर्ग उभा आहे, या मातीचा भूतकाळ आणि संदर्भ आजच्या तरुण वर्गाला समजायलाच हवे आहेत. (असे हे अगदी ‘जेन्झी’ आणि ‘अल्फा’ पिढीसाठीही योग्य नाटक आहे.)
मला आठवतं, मी सतीशचे ‘महानिर्वाण’ नाटक २५/२६ वेळा पाहिले आहे. ‘महापूर’ १४/१५ वेळा पाहिले आहे. ‘ठकीशी संवाद’ही पुन्हा पुन्हा पाहणार आहे. प्रत्येक वेळेस नव्या जागा, नवे बारकावे जाणवत राहतात. नाटक आठवून पुन्हा पुन्हा पाहायला, त्यावर विचार करायला मजा येईल, हे लक्षात येते. आजच्या काळात ‘ठकीशी संवाद’ पाहणे आणि आपल्या ठकीशी संवाद करणे गरजेचेच आहे.
लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आहेत.
sushama. deshpande@gmail. com