बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारणाऱ्या दीपिका या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ट्रिपल एक्स’ चित्रपट मालिकेतील तिसरा आणि बहुप्रतिक्षित असा हा ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बुधवारी दिली. जगातील कोणत्याही देशातील प्रदर्शनापूर्वी १४ जानेवारीला हा चित्रपट भारतीय चित्रप गृहात दाखल होईल. असे दीपिकाने म्हटले आहे. भारतामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर २० जानेवारीला हा चित्रपट इतर देशात प्रदर्शित होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

https://twitter.com/deepikapadukone/status/813999366809808896

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसच्या मंचावरुन दीपिकाने तिच्या पहिल्या ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलिवूडपटाचा ट्रेलर तिने लाँच केला होता. ट्रेलरच्या भारतीय आवृत्तीत दीपिकाचा जलवा पाहायला मिळाला. भारतात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये दीपिकाला केंद्रस्थानी ठेवण्यावर भर देण्यात आला होता. दीपिकाने कमालीची मेहनत घेतल्याचे ट्रेलर पाहून जाणवले. तिने साकारलेले अॅक्शन सिन्स, डॉयलॉग डिलिव्हरी आणि चित्रपटातील तिचा लूक सर्वकाही लाजवाब असे होते. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात दीपिकाने सेरेना नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात हॉलिवूड सुपरस्टार विन डिझेल याच्यासोबत दीपिका काम करताना दिसणार आहे. मोठ्या पडद्यावरील थरारक अॅक्शन दृश्ये साकारण्यासाठी सशक्त तसेच लवचिक बांध्याची अवश्यकता असते. चित्रपटात आपल्या वाट्याला आलेली अॅक्शन दृश्ये लिलया साकारण्यासाठी दीपिकाने कठोर फिटनेस ट्रेनिंग घेत चपळ आणि लवचिक बांधा प्राप्त केला होता. यासाठी तिने योगधारणा करण्यापासून जिममध्ये घाम गाळण्यापर्यंतचे शारीरिक परिश्रम घेतले होते. हॉलिवूडच्या पदार्पणासाठी सज्ज असलेली दीपिका सध्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये आघाडीवर आहे. नुकत्याच फोर्ब्सने प्रदर्शित केलेल्या १०० लोकप्रिय कलाकारांमध्ये दीपिकाने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले होते. या यादीत दीपिकाला आठवे स्थान मिळाले होते. सध्या दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात देखील ती महत्त्वपूर्ण भूमिका साकरताना दिसणार आहे. तिच्यासह या चित्रपटात शाहिद कपूर आणि रणवीर सिंग देखील दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The returnof xander cage will release in india first before anywhere else in the world