रेश्मा राईकवार

जिवंतपणीच आख्यायिका बनून राहिलेल्या अशा फार मोजक्या व्यक्ती असतात. त्यांना मिळालेल्या यशामुळे असेल वा त्यांच्या वेगळेपणामुळे असेल त्यांच्याबद्दलच्या अनेक दंतकथा प्रसृत होत राहतात. नवल वाटावं इतकं आभासी किंवा आपल्या कल्पनेपलीकडचं जग म्हणून आपणही या दंतकथा ऐकतो आणि सोडून देतो. वास्तवात त्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र, तद्नुषंगाने घडणाऱ्या घटना, त्याचे भवतालावर उमटणारे पडसाद असे कितीतरी आयाम असतात जे लक्षात घेतल्यानंतर समोर दिसणाऱ्या वलया पलीकडचं चित्र हळूहळू आकळत जातं. बॉलीवूडमधील ‘यशराज’ नावाची आख्यायिका पहिल्यांदाच रुपेरी पडद्यामागे नेऊन उलगडण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द रोमँटिक्स’ या स्मृती मुंद्रा दिग्दर्शित चार भागांच्या माहितीपटातून करण्यात आला आहे.

Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
premachi goshta new entry swarda thigale first reaction
सागर जुन्या मुक्ताला मिस करतोय का? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील रिप्लेसमेंटवर स्वरदा ठिगळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

यश चोप्रा म्हणजे प्रेमपटांचे बादशाह. त्यांचे चित्रपट म्हणजे भव्यदिव्य सेट्स, स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य पण गारठून टाकणाऱ्या थंडीच्या प्रदेशातही शिफॉनची सुळसुळीत साडी नेसून, पदर वाऱ्यावर उडवत अल्लडपणे नाचणारी-गाणारी नायिका आणि तिला अलगद बाहुपाशात ओढणारा, सगळय़ांच्या ह्रदयाची धडकन असलेला नायक, पंजाबी ढंगाची गाणी अशा कितीतरी प्रतिमा आपल्या नजरेसमोर तरळत राहतात. तरीही आपली आणि त्यांची ओळख ही त्या सिनेमाच्या भव्य-दिव्य रुपेरी पडद्यापुरतीच मर्यादित आहे. त्यांच्या कथांमधून, नायक-नायिकांमधून दिसणारे – जाणवणारे यश चोप्रा, त्यांच्यानंतर ‘वायआरएफ’(यशराज फिल्म्स-स्टुडिओ) मोठा करणारा त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा हे सगळं आपल्याला चित्रपटातून आणि मुलाखती-बातम्यांमधून जेवढं जाणवतं तेवढंच परिचयाचं आहे. आदित्य चोप्रा म्हणजे तर अफवा आहे, तो प्रत्यक्षात कधीच दिसत नाही.. हे त्याच्याबरोबर काम करणाऱ्या सहकलाकारांचं, लहानपणीपासून एकत्र असलेल्या मित्रांचंही म्हणणं आहे. त्यामुळे इंडस्ट्री आणि सर्वसामान्य यांच्यातील हे भेदाभेद दूर करून थेट आदित्य चोप्रांकडूनच या सगळय़ा दंतकथांमागचं रहस्य जाणून घेण्यात स्मृती मुंद्रा कमालीच्या यशस्वी ठरल्या आहेत.

यश चोप्रा ही आख्यायिका रातोरात घडलेली नाही. आणि त्यांनी केवळ प्रेमपटच दिग्दर्शित केले हेही खरं नाही हे या माहितीपटाच्या पहिल्याच ‘द बॉय फ्रॉम जालंधर’ या भागातून स्पष्ट होतं. सिनेमा म्हणजे नेमकं काय? हे आता अभिनेता-अभिनेत्री म्हणून नावाजलेल्या, पण कधीकाळी सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणेच सिनेमा नावाची जादू विस्फारल्या नजरांनी अनुभवणारे कलाकार, दिग्दर्शक, लेखक, चित्रपट अभ्यासक यांच्याकडून समजून घेत हळूहळू हा माहितीपट आपल्याला पुढे नेत राहतो.  ‘१३८ कोटी जनतेच्या भावभावनांना खेळवत ठेवणं सोपं नाही’, हे अमिताभ बच्चन यांचं यातलं वाक्य पुरेसं बोलकं आहे. आपल्याला भावणाऱ्या कथा पडद्यावरही सुंदर दिसाव्यात, एकाच चित्रपटगृहात बसून पाहणाऱ्या हजारो लोकांना त्यातील भाव नेमकेपणाने पोहोचवणं हे सोपं काम नाही. आणि याबाबतीत माहिर असलेल्या चित्रपटकर्मीपैकी एक नाव होतं ते म्हणजे यश चोप्रा. जालंधरमधील अतिशय साध्या कुटुंबातून आलेले यश चोप्रा आपल्या भावाचे बोट पकडून इंडस्ट्रीत प्रवेश करते झाले. हे दाखवतानाच त्यावेळच्या राजकीय नेतृत्वाला चित्रपट माध्यमाचा वापर मनोरंजनाबरोबरच विचार-प्रबोधन करण्यासाठी, देशातील विविध संस्कृतीतील लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कसा करता येईल, हे चित्र बी.आर.चोप्रा यांनी स्पष्ट केले होते. त्या त्या काळात घडलेल्या घटनांचा चित्रपटांवर आणि तत्कालीन चित्रपटकर्मीवर कसा प्रभाव पडत गेला याचं यथार्थ चित्रण या माहितीपटातून करण्यात आलं आहे. बी. आर. चोप्रांच्या हाताखाली दिग्दर्शनाचे धडे गिरवणाऱ्या यश चोप्रांनीही सुरुवातीच्या काळात हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणारा ‘धूल का फुल’ आणि अतिरेकी हिंदूत्ववादी विचारांच्या परिणामांविषयी बोलणारा ‘धर्मपुत्र’ असे सामाजिक आशय देणारे चित्रपट दिग्दर्शित केले होते. मग मात्र त्यांनी आपल्या चित्रपटांची शैली बदलली. मानवी नात्यांमधील गुंतागुंत, शहरी मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू यांच्या घरात घडणाऱ्या कथा, तत्कालीन नावाजलेले कलाकार यांची सांगड घालत ‘वक्त’ सारखा त्यांच्या कारकीर्दीत मैलाचा दगड ठरलेला चित्रपट त्यांनी दिला.

 कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात लग्न, संसाराच्या जबाबदाऱ्या, वडिलांच्या भूमिकेत आल्यानंतर होणारे बदल त्याच्या कामावरही परिणाम करत असतात. त्याचबरोबर देशात घडणाऱ्या राजकीय – सामाजिक घटनांचेही त्या त्या उद्योगावर कसे परिणाम होतात, याचा तपशीलवार ऊहापोह यश चोप्रा यांच्या कारकीर्दीचा वेध घेण्याच्या निमित्ताने करण्यात आला आहे. एकीकडे विवाहानंतर पत्नी पामेला यांच्या विचारांचा, बुद्धिमत्तेचा प्रभाव यश चोप्रा यांच्या एकूणच चित्रपट वर्तुळावर आणि शैलीतही पडला. पामेला यांच्या येण्यानंतर यश चोप्रा यांच्या चित्रपटातील नायिका पडद्यावर अधिक टोकदारपणे उतरल्या, असं अभ्यासक सांगतात. त्याच वेळी अँग्री यंग मॅन नायकाचा उदय, अ‍ॅक्शनपटांचा वधारलेला भाव ही आणीबाणीनंतरची देशातील परिस्थिती, त्याचा प्रभाव स्वत:च निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या यश चोप्रा यांनी कसा दूर केला? अमिताभ यांना कवी, शायर म्हणून लोकांसमोर आणत प्रेमळ, हळवा नायक त्यांनी पडद्यावर लोकप्रिय केला. मला स्वत:ला ज्या गोष्टी भावल्या त्या मी करत गेलो, असं सांगणारे यश चोप्रा, ‘सिलसिला’, ‘मशाल’, ‘विजेता’ अशा सलग अपयशी ठरलेल्या चित्रपटांमुळे खचलेले, ‘चांदनी’ आपल्या मनासारखा पडद्यावर उतरवण्याचे धाडस दाखवत आपला सिनेमा जिवंत ठेवणारे आणि पुढे मुलगा आदित्यची दिग्दर्शनाची शैली अनुभवतानाच स्वत:ही नव्या काळाशी जुळवून घेत ताकदीचे चित्रपट देणारे यश चोप्रा असे कितीतरी पैलू आपल्याला समजत जातात.

या माहितीपटाचे पुढचे तिन्ही भाग हे प्रामुख्याने आदित्य चोप्रा यांच्या दृष्टिकोनातून यश राज फिल्म्सचा प्रवास उलगडणारे आहेत. मुळातच लहानपणापासून चित्रपटसृष्टीतील लोकांमध्येच मोठा झालेल्या, श्रीमंत वातावरणात वाढलेल्या आदित्यने आपल्याला आपल्या संस्कृतीशी, चित्रपटांशी जोडलं जाणं हे वयाच्या तेराव्या वर्षी कसं उमगलं आणि तिथून दर शुक्रवारी चित्रपटगृहात सामान्य प्रेक्षकांबरोबर चित्रपट पाहात, समाजमन अभ्यासत या व्यवसायाची बाराखडी वर्षांनुवर्ष कशी गिरवली हे पहिल्यांदाच मोकळेपणाने सांगितलं आहे. घराणेशाहीचा मुद्दा किती पोकळा आहे हे त्याने स्वत:चे आणि स्वत:च्या भावाचे मासलेवाईक उदाहरण देत स्पष्ट केले आहे. यश एका रात्रीत मिळवता येत नाही हेही खरं आहे आणि वडिलांच्याच पद्धतीने विचार करून ते मिळवता आलं असतं यातही तथ्य नाही हे आदित्य चोप्राच्या वाटचालीवरून स्पष्ट होतं. यश चोप्रा ज्या ताकदीचे दिग्दर्शक होते ती आपल्याकडे नाही हे उमजून, वेळोवेळी अभ्यासातून घेतलेल्या निर्णयांचा फायदा यशराज फिल्म्स मोठं करण्यात झाला आहे  हे सांगताना आपल्याला जमलेल्या आणि फसलेल्या गोष्टीही त्याने तितक्याच मोकळेपणाने मांडल्या आहेत. तुम्ही शंभर टक्के पैसे गुंतवणार असाल तेव्हाच मी चित्रपट दिग्दर्शित करेन हा त्याचा आग्रह किती योग्य होता हे ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’च्या यशाने सिद्ध केलं. मात्र त्यानंतर पुन्हा आपण इतकाच चांगला चित्रपट दिग्दर्शित करू शकणार नाही हे कळून चुकणं, पुन्हा अपयशाचा सामना करताना ‘रब ने बना दी जोडी’ सारखा केलेला चित्रपट, शाहरुखचं मन परिवर्तन, नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यानंतर रणवीर, अनुष्का अशी उभी राहिलेली तरुण फळी ते स्वतंत्रपणे नव्या निर्मात्यांना यशराजच्या बॅनरखाली उभं करण्याचा निर्णय असा वाटचालीतला प्रत्येक टप्पा अगदी बारकाईने त्याने समजावून सांगितला आहे.

ऋषी कपूर, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, ह्रतिक रोशन, करण जोहर, राणी मुखर्जी, काजोल, उदय चोप्रा, पामेला चोप्रा, डिझाईनर मनीष मल्होत्रा असे ३५ हून अधिक कलाकार, लेखक-दिग्दर्शक, अभ्यासक यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि त्यातून मिळत गेलेल्या संदर्भाचा एक अप्रतिम कोलाज ‘द रोमँटिक्स’च्या निमित्ताने पाहायला मिळतो. एरवी चित्रपट आपल्याला रडवतात, हसवतात, विचार करायला लावतात हे आपल्याला अनुभवाचं आहे. इथे मात्र कोण्या एका चोप्रांच्या यशाची आख्यायिका पाहताना आपण शांत होतो, समजून घेतो, क्वचित डोळय़ात पाणीही येतं.. एखादा माहितीपटही आपल्याला इतका खिळवून ठेवू शकतो याची अनुभूती ‘द रोमँटिक्स’मधून मिळते आणि त्याचं पूर्ण श्रेय दिग्दर्शिका स्मृती मुंद्रा आणि त्यांच्या चमूचं आहे.

Story img Loader