पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेले ४० सैनिक आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय वायू दलाने पाकिस्तानमधील बालाकोटच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला करून दिलेले खणखणीत प्रत्युत्तर या नाट्यावर गेल्या वर्षा-दोन वर्षांत अनेक चित्रपट आले आहेत. आता याच हवाई हल्ल्यामागचं नियोजन कसं होतं, हल्ला होत असताना भारतात अधिकारी, सैनिक कशाप्रकारे काम करत होते, याची अभ्यासपूर्ण मांडणी करणारी ‘रणनीती : बालाकोट अँड बियाँड’ या वेबमालिकेतून करण्यात आली आहे. या वेबमालिकेच्या निमित्ताने अभिनेता जिमी शेरगिल आणि अभिनेत्री लारा दत्ता यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.
‘रणनीती : बालाकोट अँड बियाँड’ या वेब मालिकेबद्दल बोलताना जिमी शेरगिल म्हणाले, ‘पुलवामावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोट येथे जाऊन भारतीय सैनिकांनी कशाप्रकारे शत्रूला धडा शिकवला हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु या हल्ल्यामागील सर्व अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे काम केले? काय मेहनत घेतली? याबद्दल या वेब मालिकेतून प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. जेव्हा आपले सैनिक हवाई हल्ला करण्यासाठी शत्रू देशात गेले होते. त्यावेळी आपल्या देशातील वॉर रूममध्ये कसे वातावरण होते? त्या वॉर रूममधील प्रत्येक अधिकारी ते युद्ध कशाप्रकारे लढत होते हे या वेब मालिकेतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सीमेवर युद्ध लढणाऱ्या सैनिकांनबद्दल सर्वांना माहिती असतं पण, त्यामागची रणनीती आखणाऱ्या सैनिकांबद्दल कोणाला फारशी माहिती नसते. त्यांचेही काम देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते वॉर रूममधून सैनिकांचा आणि सामान्य नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. ही वेब मालिका अशाच सैनिकांवर आधारित आहे’.
हेही वाचा >>>नॉन व्हेज आणलं म्हणून स्टुडिओबाहेर काढलं अन्…, ‘या’ अभिनेत्याला मिळाली होती वाईट वागणूक, म्हणाला…
संतोष सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब मालिकेत अभिनेत्री लारा दत्तानेही महत्वाची भूमिका केली आहे. या मालिकेचा विषय खूप कठीण आणि गंभीर आहे, पण दिग्दर्शक संतोष सिंग यांनी उत्तम तयारी केली असल्याने अतिशय नियोजनबद्ध आणि शांतपणे चित्रीकरण पूर्ण झाले, असे लारा दत्ताने सांगितले. आशुतोष राणा, आशिष विद्यार्थी यांच्यासारखे उत्तमोत्तम कलाकार चित्रपटात असताना कोणीही एकमेकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला नाही. उलट सहकलाकारांना सांभाळून घेत चित्रीकरण झाले असल्याने हा अनुभव खूप सुंदर होता, असेही तिने सांगितले.
जिमी शेरगिलने याआधीही देशभक्तीवर आधारित चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘पोलीस अधिकारी, गुप्तहेर अशी पात्रे साकारताना अभिनेता म्हणून वेगळी तयारी करावी लागते. पण या वेब मालिकेच्या चित्रीकरणाच्या आधीच त्याचा सखोल अभ्यास झाला होता. त्यामुळे पटकथेसह माझ्या पात्राची कथा, त्याची मनस्थिती, त्यावेळचं वातावरण या सगळ्या मुद्दयांवर दिग्दर्शकाने आधीच माहिती दिली होती. त्यामुळे पटकथेचा अभ्यास आणि दिग्दर्शकाने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळे हे पात्र साकारणे सोपे गेले’ असे जिमी शेरगिलने सांगितले. मनोरंजन क्षेत्रात दीर्घकाळ असलेल्या जिमी शेरगिल यांनी आत्तापर्यंतच्या प्रवासात आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे हा धडा शिकलो असल्याचे स्पष्ट केले. तुम्ही कोणत्याही चित्रपटाचा भाग झालात तर तो मनापासून आणि प्रामाणिकपणे करा. आपल्या कामाबद्दल कोणी वाईट बोलणार नाही इतके उत्तम काम झाले पाहिजे ही दक्षता आपणच घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
अभ्यास करून या…
तुम्ही ज्या क्षेत्रात करिअर करू पाहता मग ते मनोरंजन क्षेत्र असले तरी त्या क्षेत्राचा अचूक अभ्यास करून मग कामाला सुरुवात करा. भलेही तुम्हाला उशिराने यश प्राप्त होईल, पण तुमच्या कामाची माहिती असल्यामुळे तुम्हाला भविष्यात आणखी उत्तम काम मिळेल. त्यामुळे अभ्यास करून या क्षेत्रात पदार्पण करा, असे जिमी शेरगिल यांनी सांगितले.
मानसिकदृष्ट्या कणखर असायला हवे…
२००० सालचे मनोरंजन क्षेत्र आणि आत्ता यात खूप बदल झाला आहे. सध्या समाज माध्यमांचा प्रेक्षकांवर अधिक प्रभाव आहे, असे निरीक्षण नोंदवत अभिनेत्री लारा दत्ताने समाज माध्यमांमधून होणारी टीका आणि कौतुक दोन्हीसाठी कलाकारांनी कणखरपणे तयार असायला हवे, असा सल्ला दिला. एखादा चित्रपट चालला नाही किंवा त्यावरून ट्रोल करण्यात आले की नवीन पिढीतील कलाकारांना आपले करिअरच संपल्यासारखे वाटते. मात्र प्रत्येक क्षेत्रात अपयश येणार, खिल्ली उडवली जाणार यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असणे अत्यंत गरजेचे आहे, असे लाराने सांगितले.