श्रुती कदम
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट चांगलाच गाजताना दिसतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले जाते आहे. या चित्रपटातील अभिनयापासून ते सादरीकरणापर्यंत या चित्रपटातील काम प्रेक्षकांना आवडते आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या मुख्य गाण्याचे ‘बाईपण भारी देवा’चे विशेष कौतुक केले जाते आहे. हे गीत लिहिणारे गीतकार वलय मुळगुंद यांनी आतापर्यंत ३० चित्रपटांसाठी गीतं लिहिली आहेत. तर ‘दुहेरी’, ‘युवागिरी’, ‘फ्रेशर’, ‘श्रावणबाळ रॉकस्टार’, ‘कॉमेडी बिमेडी’ या मालिकांसाठी गीतलेखन केले आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे शीर्षकच आपल्या गीतावरून ठेवले गेले याचा आनंद असल्याचे वलय मुळगुंद यांनी सांगितले.
माझ्या गीतावरून शीर्षक ठेवण्यात आले..
मुळात या चित्रपटाचे नाव ‘मंगळागौर’ होते, पण मी हे मुख्य गीत लिहिल्यानंतर या चित्रपटाचे सहनिर्माते अजित भुरे यांनी ‘बाईपण भारी देवा’ हे नाव या चित्रपटाचे ठेवूयात असे सुचवले आणि या चित्रपटाचे नाव ‘बाईपण भारी देवा’ ठेवण्यात आले. आपण जे गीत लिहिले त्यावरून चित्रपटाचे शीर्षक ठेवण्यात आले ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक लोकांनी या गाण्याचे कौतुक केले. हे गाणेच मुळात असे आहे जे लिहिताना मी भावुक झालो होतो. माझ्या यशामागे माझ्या आई आणि पत्नीचा फार मोठा वाटा आहे, तर कुठे तरी त्यांच्या भावना मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
तरी कविता करणे कधी सोडले नाही..
सुरुवातीला मी बीएस्सी करत होतो, पण काही कारणांमुळे मला ते पहिल्या वर्षांत सोडून माझ्या परिवाराचे कॅन्टीन सांभाळायला लागले. तेव्हा मी रिक्षा स्टॅन्डवर बसून कविता लिहायचो. नंतर सकाळी कॅन्टीन सांभाळून रात्र शाळा करून मी समाजशास्त्र या विषयात एम. ए. झालो, पण कधीच कवितेचे लिखाण थांबवले नाही. ‘अचानक’ या २००८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात मी पहिल्यांदा गीतकार म्’न काम केले. त्यावेळी मी लिहिलेले गीत शंकर महादेवन यांनी गायले होते. तिथून माझ्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, असे वलय यांनी सांगितले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आणीबाणी’ या चित्रपटांसाठीही वलयने दोन गाणी लिहिली असून त्यातील एक गीत हे गायक हरिहरन यांनी गायले आहे. आपले गीत ज्या गायकांनी सादर करावे असे मी तेव्हा स्वप्न पाहिले ते आता सत्यात उतरते आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कमी बजेटमुळे गाण्यावर अपेक्षित मेहनत घेता येत नाही..
पूर्वी जेव्हा एखादे गाणे मराठी चित्रपटात असायचे तेव्हा ते गाणे घडवण्यासाठी वेळ मिळायचा. त्या गाण्यावर अनेक लोकांकडून संस्कार केले जायचे, पण आता हे प्रमाण फार कमी पाहायला मिळते. आता मुळात मराठी चित्रपटांचे बजेट कमी असते त्यामुळे एखाद्या गाण्यावर अपेक्षित मेहनत घेता येत नाही. अनेकदा गाण्याचे बोल कितीही सुंदर असले तरी समोर दाखवलेली दृश्यं, नृत्य त्या ताकदीचे नसल्यामुळे गाण्यांचा प्रभाव लोकांपर्यंत पडत नाही, ही खंत मराठी गीतांबद्दल वलय यांनी व्यक्त केली.
नवीन आव्हान..
‘बापमाणूस’ या आगामी चित्रपटात मी गीत लिहिले आहे. हा चित्रपट वडील-मुलीच्या नात्यावर आधारित आहे. मी प्रत्येक वेळी माझ्या मागील कामापेक्षा आणखी उत्तम काम कसे करू शकतो हाच प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळी नवीन कथा असते त्यामुळे त्या कथेला साजेसे गीत लिहिणे हे नवीन आव्हान दरवेळी समोर असते, असे त्यांनी सांगितले.